मनोज गडनीस, मुंबई: अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या दोन महिलांनी चक्क त्यांच्या सॅनिटरी पॅडमधून कोकेन लपवून आणले होते. या तस्करीचा केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला असून तस्करीच्या या नव्या कार्यपद्धतीमुळे अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत. तर तिसऱ्या प्रकरणात एका महिलेने गुद्वारात अंमली पदार्थ लपवून आणले होते. या तिनही महिलांना अटक करण्यात आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडाच्या नागरिक असलेल्या दोन महिला अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. या महिला जेव्हा परदेशातून मुंबईत दाखल झाल्या त्यावेळी त्यांच्या सामानाची तपासणी केली तेव्हा त्यात काहीही आढळून आले नाही. मात्र, त्यांची सखोल तपासणी केली असता त्यांच्या सॅनिटरी पॅडमधे कोकेन असल्याचे आढळून आले. तर, दुसऱ्या घटनेत टाझांनिया देशाची नागरिक असलेली महिला देखील अंमली पदार्थ घेऊन मुंबईत आल्याची माहिती मिळाली होती. तिची देखील सखोल तपासणी केली असता तिने गुद्ववारागात कोकेन लपविल्याचे आढळून आले. गेल्या तीन दिवसांत डीआरआयने या तस्करीच्या घटनांच्या माध्यमातून ५६८ ग्रॅम कोकेन जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ५ कोटी ६८ लाख रुपये इतकी आहे. आजवर बॅगेत पट्ट्या लपवून किंवा अंमली पदार्थांच्या गोळ्यांचे सेवन करून त्याद्वारे तस्करी करण्याच्या घटना उजेडात आल्या होत्या. मात्र, आता या नव्याने समोर आलेल्या तस्करीच्या कार्यपद्धतीमुळे अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत.