ठाणे: हॅश ऑईलसह अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अभिजित अविनाश भोईर (२९, खर्डी, शहापूर, जिल्हा ठाणे) याच्यासह चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. त्यांच्याकडून एक कोटी ८३ लाख ३४ हजार ९८० रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे.
अलिकडेच अशाच तस्करीमध्ये दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याच चौकशीमध्ये या आरोपींनाही अटक केल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अमली पदार्थ विक्री करणाऱ्या ऋषभ संजय भालेराव (२८, शहापूर, जिल्हा ठाणे) या अमली पदार्थ तस्करास ७ फेब्रुवारी २०२४ रोजी अटक केली होती. त्याच्या चौकशीमध्ये त्याच्या ताब्यातून ३१ लाखांचे अमली पदार्थ हस्तगत केले होते. दरम्यान, पुढील चौकशीदरम्यान ऋषभ याला ड्रग्ज पुरविणाऱ्या आणखी काही जणांची नावे समोर आली.
त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके, सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे, अविनाश महाजन आणि उपनिरीक्षक सुनिल अहिरे आदींच्या पथकाने अभिजित भोईर (२९ , खर्डी, शहापूर, जिल्हा ठाणे), पराग नारायण रेवंडकर (३१, नवापाडा, डोंबिवली) या दोघांना २० फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक लाख ४६ हजार रुपयांचे चरस व गांजा अमली पदार्थ जप्त केले. तर मामा उर्फ सुरेंद्र बाबुराव अहिरे (५४) आणि राजू हरिभाऊ जाधव (४०) या दोघांना २३ फेब्रुवारी रोजी ठाणे गुन्हे शाखेने मनमाड येथून अटक केली.
यातील अहिरे याच्याकडून १२ लाख ७० हजारांचे १२७ ग्रॅम चरस (हॅश) ऑईल आणि राजू याच्याकडून एक कोटी ३८ लाखांचे एक किलो ३८० ग्रॅम चरस (हॅश) ऑईल असे एक कोटी ८३ लाख ३४ हजार ९८० रुपयांचे एक किलो ५०७ ग्रॅम चरस जप्त केले आहे. या आरोपींना चरस आॅईल कोठून आणले, ते कोणाला याची विक्री करणार होते, याबाबत सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक तुषार माने हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.