मुंबई – ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत १४ आरोपी अटकेत होते. त्यात आज ललित पाटील हा १५ वा आरोपीला साकीनाका पोलिसांनी अटक केली. सोमवारपर्यंत कोर्टाने ललित पाटीलला पोलीस कस्टडी सुनावली आहे. १० ग्रॅम एमडीपासून आम्ही तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर नाशिकमध्ये धाड टाकल्यावर १५० किलो एमडी ड्रग्ज मिळाले. ड्रग्जविरोधात पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करत आहे. ड्रग्जमुक्त महाराष्ट्र अंतर्गत ही कारवाई झाली आहे. ड्रग्जची ही यंदा मोठी कारवाई आहे असं मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलीस सहआयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले की, ऑगस्टपासून आमचा तपास सुरू आहे. तपास यंत्रणांना बरीच माहिती मिळाली होती. त्यानुसार ललित पाटीलला अटक केली आहे. ससून रुग्णालयातून तो पळाला बाबत स्वतंत्र गुन्हा आहे. त्याचा पुणे पोलीस तपास करतायेत. आम्ही ड्रग्ज प्रकरणी ही कारवाई केली होती. ड्रग्ज फॅक्टरी चालवण्यामागे या आरोपींचा सहभाग होता. आम्ही यात १५ आरोपींना अटक केली आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत ललित पाटील कुठून कसा प्रवास केला हे आम्ही चौकशीत विचारू. आमच्या टीमला माहिती मिळाल्यानंतर त्याला चेन्नईतून अटक केली. सध्या हा तपास प्राथमिक टप्प्यावर आहे. यावर जास्त भाष्य करणे योग्य राहणार नाही. आम्ही सर्व अँगलने याचा तपास करू. साकिनाका पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. अतिशय उत्तमरित्या त्यांनी काम केले. पोलीस आयुक्तांकडून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
मी पळालो नाही, पळवलं आहे – ललित पाटील
२ आठवड्यापूर्वी ड्रग्जमाफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला होता. ललितला पळवण्यामागे नाशिकच्या मंत्र्यांचा हात आहे असा आरोप काँग्रेस आमदाराने केला. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट या प्रकरणी दादा भुसे यांचे नाव घेत ललितला पसार होण्यास मदत केली असा आरोप केला. त्यानंतर ललितचा पुणे, मुंबई पोलीस शोध घेत होते. यात मुंबई पोलिसांना यश आले. चेन्नईतून श्रीलंकेला पळून जाण्याचा इरादा असताना मुंबईत पोलिसांनी त्याला अटक केली. मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला शहरात आणल्यानंतर माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर ललित पाटीलने मोठा दावा केला आहे. मी ससूनमधून पळालो नाही, तर मला पळवण्यात आले. यामागे कोणाकोणाचा हात आहे मी सगळे सांगेन असं विधान केले आहे. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणी मोठे मासे अडकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.