मुंबई : मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये काही सेलिब्रेटी तसेच त्यांची तरुण मुले यांचा समावेश असल्याचे समजते.
कोकेन, चरस, एमडी, गांजा आदी मादक पदार्थ अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. एनसीबीची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डेलिया या २००० प्रवासी क्षमतेच्या जहाजावर मुंबई-गोवा-मुंबई ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. या क्रूझवर उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यात ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळाली. शनिवारी रात्री गोव्याला जाऊन ते सोमवारी सकाळी परत मुंबईला येणार होते. त्यासाठी आयोजकांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागविले होते. एनसीबीच्या पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून क्रूझ ग्रीन गेटजवळ थांबले असताना छापा मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.