Mumbai Drug Party: मुंबईच्या समुद्रात क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणावरुन गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. अमली पदार्थ नियंत्रण कक्षानं (NCB) ड्रग्ज पार्टी उधळून लावत याप्रकरणात अटक केल्या गेलेल्या अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह दोघांना कोर्टानं ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अटकेत असलेल्या सर्व आरोपींच्या राहत्या घराची झाडाझडती घेण्याची तयारी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत एनसीबीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी या छापेमारी संदर्भात गुप्तता बाळगण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक झालेली असेल तर एनडीपीएस कायद्याअंतर्गत आरोपींच्या घराची झडती घेण्याचा कायदेशीर अधिकार एनसीबीला आहे.
दरम्यान, एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाच्या चौकशीला आता व्यापक रुप देण्यात आलं आहे. याच प्रकरणाच्या मूळाशी जाऊन अशापद्धतीच्या रेव्ह पार्टी आणि नाइट पार्ट्यांचं आयोजन करण्यांची माहिती घेण्यात येत आहे. त्यानुसार अशा आयोजकांची चौकशी केली जाईल आणि आवश्यक ठिकाणी छापेमारी देखील करण्यात येणार आहे. प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे हस्तगत करण्यासाठी एनसीबीनं आता कंबर कसली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यन खान व्यतिरिक्त दिल्लीस्थित मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इश्मीत सिंह, मोहक जायसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोपडा आणि अरबाज मर्चंट यांना अटक केली आहे. या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. या सर्वांचं राजधानी दिल्लीशी थेट कनेक्शन आहे.
मुंबईतील ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवनवे खुलासे आता होऊ लागले आहेत. यात एनडीपीएस कायद्याचा विचार करायचा झाल्यास कायद्यानुसार ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी वेगवेगळ्या प्रकारची कारवाई केली जाण्याची तरतूद आहे. या कायद्यात आतापर्यंत चार वेळा बदल करण्यात आलेला आहे. यात गुन्ह्याच्या स्वरुपावर निर्धारित वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद आहे. यातील कलम १५ अंतर्गत १ वर्ष, कलम २४ अंतर्गत १० वर्ष आणि १ लाखांपासून २ लाखांपर्यंतच्या दंडाची तरदूत आहे. कलम ३१ ए अंतर्गत आजीवन कारवासाची तरदूत देखील आहे.
कोणकोणत्या आरोपींचं आहे दिल्ली कनेक्शन?१. मुनमुन धमेचा: मुनमुन धमेचावर ड्रग्ज पार्टीत ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप आहे. ती एक दिल्ली स्थित मॉडल असून एका मोठ्या ब्रँडसाठी ती मॉडलिंग करते. ती मूळची मध्य प्रदेशची आहे. पण तिचं राहतं घर सध्या दिल्लीत आहे. दिल्लीतील तिच्या निवासस्थानाची झडती घेतली जाऊ शकते.
२. इश्मित सिंह: इश्मित दिल्लीतील बड्या उद्योगपतीचा मुलगा असून तो या पार्टीत कसा पोहोचला याचा खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही. एनसीबीकडून त्याची चौकशी सुरू आहे.
३. मोहक जायसवाल: मोहक जायसवाल देखील दिल्ली स्थित एक मोठा व्यावसायिक आहेत. त्यांचं दिल्लीत घर असून त्यांच्याही घराची झडती घेतली जाऊ शकते.
४. गोमीत चोपडा: गोमीत हा एक प्रसिद्ध हेअर स्टाइलिस्ट आहे. दिल्लीच्या योजना विहार येथील तो रहिवासी आहे. गोमीतच्या आईनं नुकतीच एनसीबीच्या कार्यालयात येऊन त्याची भेट घेतली होती.
५. विक्रांत छोकर: विक्रांत छोकर दिल्ली स्थित एका खासगी कंपनीमध्ये प्रोडक्टिव्हिटी हेड पदावर कार्यरत आहे.
६. नुपूर सारिका: आरोपी नुपूर सारिका देखील एक मोठी उद्योगपती आहे. पार्टीत ती कुणाच्या माध्यमातून पोहोचली याची चौकशी सध्या सुरू आहे. तिच्याही घरी एनसीबीकडून झडती घेतली जाऊ शकते.