गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील गांधीधाममध्ये कोट्यवधी रुपयांचे 80 किलोहून अधिक ड्रग्स जप्त करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत जवळपास 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. हे ड्रग्स समुद्र किनाऱ्यावर टाकून दिलेली आढळून आली. एफएसएलच्या प्राथमिक तपासात हे कोकीन असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीधाम शहराजवळ 80 पॅकेटमध्ये कोकीन सापडलं. प्रत्येक पॅकेटचे वजन एक किलोग्रॅम आहे. कच्छ-पूर्व विभागाचे पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितले की, कदाचित पकडले जाण्याच्या भीतीने तस्करांनी येथे ड्रग्स टाकून पळ काढला असावा, कारण पोलीस या ठिकाणी लक्ष ठेवून होते.
एसपी सागर बागमार यांनी सांगितले की, ड्रग्सच्या डिलिव्हरीबाबत माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या पथकाने शोधमोहीम तीव्र केली. यावेळी आम्ही समुद्र किनाऱ्यावरून कोकीनची 80 पाकिटं जप्त केली. त्यांची किंमत 800 कोटी रुपये आहे. बागमार यांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी गांधीधामजवळ जप्त करण्यात आलेल्या पॅकेटचा पूर्वी सापडलेल्या पॅकेटशी कोणताही संबंध नाही. असं दिसतं की हे अलीकडेच पॅक केले गेले आहेत. ही पाकिटं त्याच मालाचा भाग आहेत ज्याचा आम्ही माहितीनंतर मागोवा घेत होतो.
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि इतर एजन्सींनी गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानजवळील जखाऊजवळच्या किनाऱ्यावरून अनेक वेळा हेरॉईन आणि कोकीनने भरलेले पॅकेट जप्त केली आहेत. येथे तपास केला असता, पकडले जाऊ नये म्हणून तस्करांनी ड्रग्सची पाकिटं समुद्रात फेकून दिली होती, त्यानंतर ती किनाऱ्यावर वाहून गेल्याचे आढळून आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.