म्हापसा : गोव्यातील पर्यटन हंगामाची सुरुवात झाली असतानाच कळंगुट पोलिसांनी अमली पदार्था विरोधाची मोहीम सुरूच ठेवली आहे. पोलिसांनी नायजेरियन नागरिकाकडून पावणेदोन लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ ताब्यात घेतला आहे. सदर संशयिता विरोधात करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. कळंगुट पोलिसांनी केलेली या वर्षातील ही ३७ वी कारवाई आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई गुरुवारी रात्री कांदोळी येथील ओ हॉटेल नजिक करण्यात आली. या प्रकरणात नायजेरियन नागरिक थोगो चिगोझी (३३) याला ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याने वापरलेली दुचाकी सुद्धा ताब्यात घेतली आहे. संशयित अमली पदार्थ घेवून येणार असल्याचा सुगावा लागताच त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आलेला.त्याच्याकडून ११९६ किलो ग्रॅम चरस, ४ ग्रॅम कोकेन, १७ ग्रॅम चरस मिळून १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आला आहे. थोगो चिगोझीच्या विरोधात करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. २०१५ साली त्याला कळंगुट पोलिसांनी दुसºया एका अशाच प्रकारच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. त्यानंतर २०१८ साली त्याची सुटका करण्यात आलेली.संशयिता विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रिमांडासाठी त्याला न्यायालया समोर हजर करण्यात येणार आहे. सदरची कारवाई निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या नेतृत्वाखाली महिला उपनिरीक्षक दीपा देयकर, कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, शशांक साखळकर, दिनेश मोरजकर, सुरेश नाईक यांनी केली. पुढील तपास अधीक्षक उत्कृर्ष प्रसून्न तसेच उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विराज नाईक करीत आहे.
कळंगुट परिसरात नायजेरियन नागरिकाकडून पावणेदोन लाखांचे अंमली पदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 1:27 PM