लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नालासोपारा येथे ड्रग्जची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकत तब्बल १४०० कोटी रुपये मूल्याचे ७०१ किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्याची धडक कारवाई गुरुवारी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) केली. पोलिसांनी याप्रकरणी पाचजणांना अटक केली असून, त्यातील एकजण उच्चशिक्षित असल्याचे आढळले.
एएनसीच्या वरळी पथकाने २९ मार्च रोजी २५० ग्रॅम एमडीसह गोवंडीतून एकाला अटक केली. त्यांच्याच चौकशीतून अन्य आरोपींची धरपकड सुरू झाली. अन्य एकाला अटक करताच त्याच्याकडून तब्बल २ किलो ७६० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला. तपासात महिलेचा सहभाग समोर येताच तिला २७ जुलै रोजी बेड्या ठोकल्या. तिच्या चौकशीतून आणखीन एक आरोपी पथकाच्या हाती लागला. या साखळीच्या म्होरक्यापर्यंत पोहोचण्यासाठी एएनसीचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जणांचे पथक तयार करण्यात आले. मुख्य आरोपी टेलिग्रामसह सोशल मीडियावरील विविध माध्यमांद्वारे एमडीची घाऊक विक्री करत होते. २५ किलोहून अधिक ड्रग्जची विक्री सुरू होती.
नालासोपारा येथील हनुमान नगरच्या सीताराम इमारतीच्या गाळा क्रमांक १ मधून पथकाने ७०१ किलो एमडी जप्त केला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात १४०० कोटी रुपये किंमत आहे.
स्वतःच बनवायचा एमडीमुख्य आरोपीने केमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अनेक बड्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. दोन कंपन्यांचा सीईओही बनला. मात्र, तेथेही न पटल्याने थेट एमडी तस्करीचा मास्टरमाइंड बनल्याचा धक्कादायक प्रकार या कारवाईतून उघडकीस आला. आरोपीने १९९७ मध्ये लग्नानंतर मुंबई गाठली. दोन कंपन्यांमध्ये सीईओ म्हणून जबाबदारी पार पडली. मात्र, नंतर त्याने स्वतःच वेगवेगळे केमिकल एकत्र करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वी यू-ट्यूबवर प्रशिक्षण घेत स्वतःच एमडीमधला तज्ज्ञ बनला.
केशकर्तनकार तस्कर एएनसीच्या घाटकोपर युनिटने मुंबई सेंट्रल येथून गुरुवारी मोहम्मद शाहरुख शफी शेख (२८) या नाभिकाकडून १ कोटी ९९ लाख किमतीचा ९९५ ग्रॅम एमडी जप्त केला आहे. तो वरळीच्या पेनिनसुला इमारतीच्या आठव्या मजल्यावर राहत हाेता.