नालासोपारा - दारुड्या चालकांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडून कारवाई सुरू केलीअसली तरी ३१ डिसेंबरच्या रात्री एका मद्यपी वाहनचालकाने एका विद्यार्थांचा नाहक बळी घेतल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी मद्यपी चालकाला अटक केली आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री नालासोपारा लिंक रोड येथील अर्थव हाईटमध्ये राहणारा मंदार कासेकर घरी आलेल्या पाहुण्याला सोडण्यासाठी निघाला होता. मंदार आपली ऍक्टिव्हा दुचाकी चालवत होता तर नंदकिशोर राठोड हा त्याच्या मागे बसला होता. रात्री अकराच्या सुमारास लिंक रोडवरून जात असताना अग्रवाल नगरीच्या विरूध्द दिशेने भरधाव वेगाने एक झायलो गाडी (एम एच ४८ ए सी ७१५३) आली. या गाडीने दुभाजक तोडून थेट ऍक्टिव्हाला धडक दिली. या धडकेत ऍक्टिव्हा चालवणारा मंदार जागीच ठार झाला तर त्याच्यामागे बसलेला नंदकिशोर राठोड गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुळींज पोलिसांनी झायलो गाडीचा चालक विकास वाल्मिकी याला अटक केली आहे. मद्यप्राशन करून तो गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मंदार हा नालासोपारा लिंक रोडला विवाहित बहिणीकडे रहात होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून आई गावी रहाते. तो मदर मेरी स्कुलमध्ये नववीत शिकत होता. ३१ डिसेंबरच्या रात्री त्याच्या मेहुणा देवानंद नारायण याचा मित्र नंदकिशोर राठोड भेटायला आला होता. मेहुण्याने रात्र झाली म्हणून नंदकिशोरला सोडण्यासाठी मंदारला सांगितले होते. मात्र, दुर्देवी अपघातात मंदारचा बळी गेला.