अमरावती : तो मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचला. बायकोला नाना तऱ्हेचे बोलला. तेवढ्यावरच न थांबता त्याने चक्क बायकोला पकडून तिचे पाय जमिनीवर असलेल्या गॅस शेगडीवर धरले. त्यात तिचे दोन्ही पाय जळाले. त्याच्या तावडीतून सुटून ती घराबाहेर जीव वाचवत धावली. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ६:३० च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार कापूसतळणी येथे घडला. यातील पीडिता २४ टक्के जळाली. आरती मुकेश तिडके (३०, रा. कापूसतळणी) असे जखमी महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी माहुली जहागिर पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पीडित जखमी विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपी पती मुकेश अशोक तिडके (३८, कापूसतळणी) याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला. जखमी महिला अद्यापही अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. तक्रारीनुसार, आरोपी मुकेश तिडके हा पत्नी आरती हिला दारू पिऊन वारंवार त्रास देतो. तिला मारहाणदेखील करीत होता. तिचा शारीरिक, मानसिक छळ करून त्याने अलीकडे तिचे जिणे मुश्किल केले होते. तो तिला घरातून हाकलून देण्याची धमकीदेखील देत होता.
दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास मुकेशने पत्नीशी वाद घातला. तू तुझी मजुरी करत जा नि तुझे पोट भर, असे तो दारूत बरळला. अशातच त्याने घरातील स्वयंपाकघरात जमिनीवर असलेल्या गॅस शेगडीच्या पेटत्या बर्नरवर धरून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्यात तिचे दोन्ही पाय जळाले. तिची आरडाओरड ऐकून काही शेजाऱ्यांनी तिडकेंच्या घरी धाव घेतली. तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. तेथे तिने घडलेला सर्व प्रसंग आईला सांगितला. त्यावर तिच्या आईने १६ फेब्रुवारी रोजी माहुली पोलिस ठाणे गाठले.