नागपूर : एका हॉटेलमध्ये पहाटेच्या वेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना झालेल्या वादानंतर एमडीच्या नशेत असलेल्या विद्यार्थिनीने प्रियकरावर चाकूने वार करत जखमी केले. प्रियकराने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी कपड्यांविनाच हॉटेलच्या लॉबीच्या दिशेने धूम ठोकली. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित विद्यार्थिनी नीटच्या परीक्षेची तयारी करत असून अभ्यासाऐवजी हे असे प्रताप केल्यामुळे पोलिसांनीदेखील डोक्यावर हात मारला. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तरुणाविरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे तर विद्यार्थिनीविरोधातदेखील प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अनिकेत आशीष धेडगे (२७, रामबाग कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. तरुणी पुर्व विदर्भातील असून ती नागपुरात नीटची तयारी करण्यासाठी आली आहे. अनिकेत व संबंधित तरुणीची दोन दिवसांअगोदर मैत्री झाली व दोघे एकमेकांच्या जवळ आले. मुलीला एमडीचे व्यसन आहे व त्यासाठी पैसे मिळविण्यासाठी ती सातत्याने प्रयत्नरत असते. अनिकेतसोबत ती गुरुवारी फिरली.
रात्री एक वाजताच्या सुमारास दोघेही घाट रोडवरील हॉटेल सिल्व्हर नेस्टमध्ये गेले. तेथे तिने एमडी सेवन केले व त्यांच्या शारीरिक संबंध झाले. पहाटे सिगारेट व एनर्जी ड्रींक पिण्यासाठी दोघेही मेडिकल चौकात कारने गेले. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अनिकेतने विद्यार्थिनीसोबत परत संबंध बनविण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यात पैशांवरून वाद झाला. नशेत असलेली विद्यार्थिनी आक्रमक झाली व तिने अनिकेतवर चाकूने वार केला. त्यात त्याच्या हात, मनगट व खांद्याला जखम झाली. त्याच अवस्थेत त्याने बाहेर पळ काढला व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
त्याला त्या अवस्थेत पाहून हॉटेल कर्मचारीदेखील बुचकळ्यात पडले. त्यांनी लगेच गणेशपेठ पोलीस ठाण्याला माहितची दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अनिकेत व तिला मेडिकलमध्ये नेण्यात आले. अनिकेतच्या तक्रारीवरून विद्यार्थिनीवर हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एमडी देऊन त्या नशेत अनिकेतने अत्याचार केल्यामुळे हल्ला केल्याचा दावा करत विद्यार्थिनीने त्याच्याविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल केला आहे.
एमडीच्या नशेमुळे गाठले टोकसंबंधित विद्यार्थिनी ही चांगल्या कुटुंबातील आहे. मात्र व्यसनामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असते. कुटुंबियांनी तिला विश्वासाने नीटच्या तयारीसाठी नागपुरात पाठविले होते. मात्र वाईट संगतीमुळे अभ्यासाऐवजी भलत्याच गोष्टींमध्ये तिचा वेळ जाऊ लागला. तिच्याकडे एमडी कुठून आली, चाकू तिला कुणी दिला याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.