मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठ-दिल्ली रोडवर रविवारी रात्री रोड रेजची धक्कादायक घटना घडली. एका कंटेनरने कारला धडक दिली. यानंतर कार चालक आणि कंटेनर चालकाचा वाद सुरू झाला. त्यानंतर संतापलेल्या कंटेनर चालकाने गाडी सुरू केली आणि समोर उभी असलेल्या कारला 2 किमी फरफटत नेले. घटनेच्या वेळी कारमध्ये तीन तरुण बसले होते, त्यांनी उडी मारुन आपला जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कुमार नावाचे व्यक्ती रविवारी त्यांच्या कारने शहरात आले होते. त्यांच्यासोबत कामगार राजेश, विजय आणि अनिल होते. हे चौघे रात्री उशिरा एका साईटवरुन घरी परतत होते. यावेळी मंडईकडून येणाऱ्या कंटेनरने अनिलच्या कारला जोरदार धडक दिली. यावेळी कंटेनर चालकासोबत वाद झाला. त्यानंतर कंटेनरचालक संतापला आणि त्याने गाडी ओढण्यास सुरुवात केली. अनिलने बाजूला सरकून स्वत:ला वाचवले, मात्र त्यांचे कामगार गाडीत अडकले. त्यांनी आरडाओरडा केला, मात्र चालकाने गाडी थांबवली नाही.
गाडीत अडकलेले लोक आरडाओरड करत होतेकारमध्ये अडकलेले तिघेही आरडाओरड करत होते. कंटेनर चालकाला वाहन थांबवण्याची विनवणी करत होते, मात्र त्याने गाडी थांबवली नाही. यानंतर तिघांनीही उडी मारून जीव वाचवला. यादरम्यान पीआरव्ही टीम आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांनी कंटेनरचा पाठलाग केला. त्याला थांबण्यास सांगितले, पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे 5-10 मिनिटांनी कंटेनर मेट्रोच्या खांबाला धडकला आणि थांबला. यानंतर मागून येणाऱ्या लोकांनी चालकाला खाली उतरवून बेदम मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चालकाची सुटका करून त्याला पोलीस ठाण्यात आणले. अमित असे कंटेनर चालकाचे नाव आहे.