विमाननगर - मद्यधुंद संगणक अभियंत्याने कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीने पेट घेऊन झालेल्या विचित्र गंभीर अपघातात दुचाकीस्वार युवतीचा होरपळून मृत्यू झाला. गुरूवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा गंभीर अपघात झाला.
या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी श्रध्दा मधुकर बांगर (वय 22 रा. चाटे स्कूलजवळ,चंदननगर)हिच्या मृत्यूसाठी जबाबदार कारचालक मनीष बळीराम चौधरी (वय37,रा.पाषाण रोड,पुणे) याला तात्काळ अटक केली. या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील दर्गा रोड येथे गुरूवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास कारने दुचाकी धडक दिल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून चंदननगर पोलिसांना मिळाली होती. चंदननगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी नगररोड कडे जाणारी स्कूटी पेप दुचाकी क्र.(एम एच 31,सीएफ 8371) ला मागून भरधाव वेगाने आलेल्या कार क्र.(एमएच 12आरवाय 2296)ने जोरदार धडक दिली. या गंभीर अपघातात दुचाकीने अचानक पेट घेतला. या गंभीर अपघातात दुचाकीवरील युवती होरपळून जखमी झाली. उपचारासाठी तिला ससून रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी मद्यधुंद कारचालक मनीष चौधरीला ताब्यात घेऊन अटक केली. दुचाकीस्वार युवतीच्या अपघाती मृत्युप्रकरणी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण वराळ करीत आहेत.