पुणे - मुंढव्यातील पिंगळे वस्ती येथील गंगा आॅर्चिड सोसायटीचे कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना नागरिकांच्या मदतीने मध्यरात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाशकुमार रंगाराम मेघवंची (वय २२), किसन मांगीलाल मेघवाल (वय १९) आणि भरत प्रतापसिंग ईरागर (वय १९) असं या तीन आरोपींची नाव आहेत. हे तिघेही बालाजी सुपर शॉपीमागे, तुपे कॉर्नर, हडपसर येथे राहणारे असून मूळचे ते राजस्थानचे आहेत.
दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा दिवस असल्याने त्या दिवशी विशेषत: नागरिक रोख रक्कम व दागिन्यांचे पूजन करतात. त्यामुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेने गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व त्याचे अधिकारी, कर्मचारी गस्त घालत असताना मध्यरात्री २ वाजता दोन जागरुक नागरिकांनी गंगा आॅर्चिड सोसायटीतील एचडीएफसी बँकेचे एटीएममध्ये काहीजण संशयास्पदरित्या चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. पोलीस नियंत्रण कक्षाने कळविल्याने मुंढवा मार्शल पोलीस शिपाई बालाजी व्यंकट काटे, पोलीस नाईक आढारी हे तेथे गेले. त्यांना तिथे दोन नागरिकांनी आम्ही काही जणांना चोरी करण्यासाठी बोलताना ऐकल्याचे सांगितले. त्यांनी परिसरात शोध घेतल्यावर त्यांना पाहून बाजूला लपणारे दोघे व आत एटीएम मशीनची तोडफोड करुन रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अशा तिघांना ताब्यात घेतले़. रात्र गस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पी़. एच़. रेजीतवाड यांनी तिघांना अटक केली़ आहे तर पोलीस उपनिरीक्षक अमीत वाळके अधिक तपास करीत आहेत.