शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) - खुनाच्या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे-हडपसरचे पोलीस एका आरोपीस येरोळ (ता. शिरूर अनंतपाळ) येथे घेऊन आले होते. तेव्हा या आरोपीने पोलिसांना हिसका देत बेड्यांसह पलायन केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, पुणे-हडपसर येथील पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात विकास रघुनाथ सूर्यवंशी (२७, रा. हेळंब, ता. देवणी) यास अटक केली होती. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी हे पोलीस गुरुवारी आरोपी सूर्यवंशी यास येरोळ येथे आणले होते. दरम्यान, सदरील आरोपीने पोलिसांना हिसका देत नजिकच्या उसात पसार झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र रात्री उशिरापर्यंत सापडला नाही. अखेर पोलीस कमर्चारी अनिल कुसळकर यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यांसह आरोपीने केले पलायन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 9:15 PM