जमीर काझी मुंबई गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बढतीचा मार्ग त्यांच्या प्रलंबित वार्षिक गोपनीय अहवालामुळे (एसीआर) रखडला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी नियुक्तीला असलेल्या या अधिकाऱ्यांचे २०१७-१८ या वर्षातील अहवाल घटकप्रमुखांकडून सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे २०० वर अधिकाऱ्यांची पदोन्नती आणखी काही काळ लांबणीवर पडली आहे. वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांचे प्रलंबित एसीआर शुक्रवार, ७ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मुख्यालयात सादर करावेत, अशी सक्त ताकीद पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी सर्व घटकप्रमुखांना दिली आहे. अहवालाची पूर्तता न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.पोलिसांचीही पदोन्नती ही अन्य शासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे सेवाज्येष्ठता आणि त्यांच्या कामाचे मूल्यमापन असलेल्या ‘एसीआर’वर अवलंबून असते. अन्य विभागाकडून हे काम बहुतांशवेळा नियमितपणे निर्धारित वेळेत पूर्ण केले जात असले तरी पोलिसांबाबत मात्र यासंदर्भात नेहमीच उदासीनता बाळगली जात असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेच गेल्या जवळपास सव्वा वर्षापासून उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाºयांच्या बढत्या रखडल्या आहेत.बढतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती ३१ मेपर्यंत करण्याचे नियोजन महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात त्याबाबत आस्थापना विभागाकडून पडताळणी केली जात असताना अनेक अधिकाऱ्यांचे २०१७-१८ या वर्षातील वार्षिक गोपनीय अहवाल मुख्यालयात सादर झालेले नाहीत. त्याबाबत दोन ते तीनवेळा स्मरणपत्र पाठवूनही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सर्व घटकप्रमुखांना आता एसीआर सादर करण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे.प्रलंबित एसीआर कोणत्याही परिस्थितीत ७ जूनपर्यंत पोलीस मुख्यालयात सादर करावेत, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षक व घटकप्रमुखांना केले आहेत. निर्धारित मुदतीमध्ये अहवाल न पाठविल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
बढतीच्या प्रतीक्षेत अनेक जण निवृत्तपोलीस साहाय्यक निरीक्षक, निरीक्षक व उपअधीक्षक दर्जाची अनेक पदे रिक्त असतानाही गेल्या वर्षभरापासून या पदावर बढत्या देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यासाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांत अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे निरीक्षक खात्यातील ३२ ते ३३ वर्षांच्या सेवेनंतर बढतीच्या प्रतीक्षेत अनेक जण ३१ मे रोजी निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी पदोन्नती मिळेल, ही त्यांची इच्छा अपूर्णच राहिली आहे.