मुंबई - देश आणि जगावर वारंवार हल्ले करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा महाले यांनी आंतरराष्ट्रीय तसेच न्यायालयात सिद्ध केला. यामुळे महाले साहेब, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस जिंकल्याचे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यानी केले. २६/११ हल्यातील मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांच्या २६/११ कसाब आणि मी या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास शहराचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह-पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह माजी आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. २६/११ हल्यादरम्यान नेमके काय झाले हे केवळ महाले साहेबच सांगू शकतील. कारण अगदी जवळून या हल्याचा तसेच कसाबचा अभ्यास त्यांनीच केला होता. यावेळी घरातील व्यक्तीना दुय्यम स्थान देऊन, महालेंनी पोलीस कर्तव्याला अग्रक्रम दिला. मात्र त्यांचा मला एका कारणामुळे प्रचंड राग आला होता. तो म्हणजे त्यांनी पोलीस दलातुन स्वेच्छानिवृत्ती घेतली असे पडसलगीकर म्हणाले. पुढे ते म्हणाले, त्यांच्या सारख्या अधिकाऱ्याची पोलीस दलाला आवश्यक्ता होती. त्याचप्रमाणे, या हल्याचा तपास करताना महाले अणि त्यांच्या ९८ जणांच्या टिमने टिमवर्क काय असते ? ते दाखवून दिले. असे हे टिमवर्क पोलीस दलात आवश्यक आहे. मात्र सध्या एकमेकांबद्दल धुसफुस सुरु असल्याची नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली. महाले साहेबांनी अहोरात्रं काम करून ९० दिवसात २६/११ हल्ल्याचे आरोपपत्र तयार करण्याचे अतिशय अवघड काम केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिले की पाकिस्तानातून आलेल्या व्यक्तीनेच हा हल्ला घडवून आणला आहे. या सर्व तपासातील सत्य महालेंनी बाहेर काढल्याचे मत पडसलगीकर यांनी व्यक्त केले.
एका इंग्रजी लेखकाने लिहलेल्या द सिझ या पुस्तकाचे मराठीत भाषांतर झाल्यानंतर त्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले. त्यावेळी या पुस्तकात मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढल्याने मला राग आला. त्यानंतर सत्य बाहेर काढण्यासाठी मी पुस्तक लिहण्यास घेतल्याचे रमेश महालेंनी सांगितले. २६/११ ला झालेला हल्ला नेमका गँगवार होता की काय ?काहीच समजत नव्हते. अशावेळी प्रथमच पहिला फोन आला तो दत्ता पडसलगीकर साहेबांचा. हा हल्ला पाकिस्तानचा असल्याची पहिली माहिती त्यानी दिल्याचे देवेन भारती यानी सांगितले. त्यावेळी नवी दिल्ली येथे आयबी या गुप्तचर यंत्रणेत मुंबईसाठी जबाबदारी पार पाडत होते.