मुंबई - चेंबूर परिसरात सिगारेट आणून देण्यास नकार दिल्याच्या रागातून चार सराईत आरोपींनी एका भाजी विक्रेत्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. कमलेश रामेश्वर जाधव (वय ३३), अहमद हुसेन नबी हुसेन खान उर्फ गुड्डू (वय ३५) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील दोन आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देत, गुप्ताला तात्काळ जवळील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी कमलेश आणि अहमद या दोघांना अटक केली असून त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. या चारही आरोपींवर अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचं चेंबूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. चेंबूरच्या इंदिरानगर परिसरातील चेंबूर कॅम्प परिसरात शिवालाल गुप्ता हा १९ वर्षीय तरुण भाजी विक्रेता आहे. सोमवारी कमलेश रामेश्वर जाधव (वय ३३), अहमद हुसेन खान, मनिष कोंडवळकर आणि अक्रम हे सराईत आरोपी दारू पिवून तिथे आले होते. सर्व नशेत असल्यानं त्यांनी गुप्ताला जवळील टपरीहून सिगारेट आणण्यास सांगितले. दरम्यान, भाजी विक्रेत्याकडे भाजी खरेदीसाठी गर्दी केली. तेव्हा गुप्ताने जाण्यास नकार दिला. यावरून त्या चौघांनी गुप्ताला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद इतका टोकाला गेला की या चौघांनी स्वतःजवळील चाकूने गुप्तावर गंभीर वार केले. या हल्ल्यात गुप्ता हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर या चौघांनी घटनास्थळाहून पलायन केले.