मुंबई - कुरार परिसरात दारूच्या नशेत तबेला चालकाने गोळीबार केला. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला़ यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कुरार पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपीला जेरबंद केले़ आहेत.
दिनेश कनोजीया (वय ३४) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशमधील आझमगड परिसरातील रहिवासी आहे. त्याचा कांदिवली पूर्वेकडील क्रांतीनगर येथील खंडू कम्पाउंडमध्ये एक तबेला आहे. त्याच्याच समोर सुतारकाम करणारा विश्वकर्मा राहण्यास आहे. कनोजीया आणि विश्वकर्मा यांच्यात वैमनस्य आहे. बुधवारी रात्री १०च्या सुमारास कनोजीया दारूच्या नशेत कम्पाउंडमध्ये दाखल झाला. त्याच्याकडे देशी कट्टा आणि ३ जिवंत काडतुसे तसेच २ मॅगझीन होती. कनोजीया अवघड बाबा मंदिरात बसलेल्या विश्वकर्मा याला शिवीगाळ करू लागला. तेव्हा, ‘मंदिरातून बाहेर जाऊन तुला जे बोलायचे आहे ते बोल,’ असे विश्वकर्माने त्याला बजावले. त्याच रागात कनोजीयाने गावठी कट्टा काढत विश्वकर्मा यांच्या दिशेने एक राउंड फायर केला. सुदैवाने त्याचा नेम चुकला आणि विश्वकर्मा बचावला. या प्रकरणी स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षावर फोन केला आणि कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तितक्यात कनोजीया तेथून पसार झाला. कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. जी.एस. घार्गे आणि जे.एस. वाघमारे यांनी अत्यंत शिताफीने त्याचा पाठलाग करीत साकी नाका परिसरात असलेल्या त्याच्या मामाच्या घरातून कनोजीयाच्या मुसक्या आवळल्या. तो सामान घेऊन मध्य प्रदेशला पळण्याच्या तयारीत असतानाच त्याचा गाशा कुरार पोलिसांनी गुंडाळला. त्याच्याकडून शस्त्रास्त्रे हस्तगत करीत त्याला गुरुवारी बोरीवली सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.