मुंबई - वडाळा पूर्वेकडील बरकत अली नाका येथे राहणारा दहावीचा विद्यार्थी सीएसएमटी येथील अंजूमन इस्लाम शाळेत शिकत होता. शाळेतून घरी जाण्यासाठी मस्जिद बंदर स्थानकातून त्याने लोकल पकडली. लोकल सुरु होताच मोहम्मद जुबेर शेख (१७) आणि त्याच्या मित्र यांच्यासमवेत लोकलच्या दरवाज्यात उभे राहून स्टंट करण्यास सुरुवात केली. मुळात लोकल रिकामी असताना काही प्रवाशांनी शेख आत बसण्याचा सल्ला दिला. मात्र, स्टंट करण्याच्या नादात असलेल्या शेखने त्याकडे दुर्लक्ष केले.
सॅण्डहर्स्ट रोड ते डाकयार्ड रोड स्थानकादरम्यान लोकलने वेग घेताच शेखने दरवाज्याच्या खांबाला पकडून शरीर संपूर्ण लोकल बाहेर लोंबकळत ठेवत स्टंट करण्यास सुरुवात केली. याचवेळी रुळांशेजीर खांबावर शेख जोरदार आदळला. या अपघातामुळे शेख गंभीरपाने जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी अपघातीमृत्यूची वडाळा रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.