पुणे : परदेशात जाण्यासाठी स्वस्तात विमान तिकिटे देण्याच्या बहाण्याने साडेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी राजस्थानातून अटक केली. रतनलाल जति अग्रवाल (वय ३०) आणि अमित सिंह (वय ३२, दोघे मूळ रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सुषमा शर्मा (वय ५२,रा. सागर तरंग, वरळी, मुंबई) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. शर्मा यांना तातडीने अमेरिकेला जायचे होते. विमान तिकिटांची नोंदणी करण्यासाठी त्यांनी सहल कंपन्या आणि आरोपींच्या संकेतस्थळांची पाहणी केली होती. त्यावेळी टुकान ट्रॅव्हल्स कंपनीच्या संकेतस्थळावर स्वस्तात अमेरिकेची तिकिटांची नोंदणी केली जाईल, अशी जाहिरात शर्मा यांनी पाहिली. त्यानुसार शर्मा यांनी संकेतस्थळावर असलेल्या मोबाइल नंबरवर फोन करून आरोपी अग्रवाल आणि सिंह यांच्याशी संपर्क साधला. सिंह आणि अग्रवाल यांनी शर्मा यांनी त्वरीत पुण्यातील मार्के यार्ड भागात असलेल्या एका बँकेच्या खात्यात साडेतीन लाख रुपये भरण्याची सूचना केली. व्हॉटसअॅपच्या माध्यमातून दोन तिकिटांचे छायाचित्रे पाठवितो, असे दोघांनी त्यांना सांगितले.
आरोपींनी दिलेल्या सूचनेनंतर शर्मा यांनी साडेतीन लाख रुपये मार्केटर्याडातील साऊथ इंडियन बँकेच्या खात्यात भरले. दरम्यान, दोघांच्या मोबाइल क्रमांकावर शर्मा यांनी संपर्क साधला. तेव्हा मोबाइल बंद असल्याचे निदर्शनास आले. शर्मा यांना तातडीने अमेरिकेला जायचे होते. त्यामुळे त्यांनी टुकान ट्रॅव्हल्स कंपनीबाबत चौकशी केली. तेव्हा अशा प्रकारची कंपनी अस्तिवात नसल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्याचा तपास मार्के टर्याड पोलिसांकडे सोपविण्यात आला.
पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त मिलींद पाटील, पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार, संजय सातव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गवळी, संदीप जाधव, मंगेश साळुंके, नितीन जाधव, संदीप घुले, अनिस शेख, रूपाली चांदगुडे, निशांत कोंडे यांनी तपास सुरू केला. सहाय्यक निरीक्षक गवळी यांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून दोन आरोपी राजस्थानातील असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने राजस्थानातून सिंह आणि अग्रवाल यांना ताब्यात घेतले.