ठाणे: एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी मध्यप्रदेशातून रेल्वेने थेट ठाण्यात अनावधानाने पोहोचली. या मुलीला कोपरी पोलिसांनी तिची आस्थेने चौकशी करुन तिला पुन्हा पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांनी सोमवारी दिली.
शर्मिला वराठे (नावात बदल) ही १४ वर्षीय मुलगी २९ जून २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोपरी परिसरात बीट मार्शल पोलीस हवालदार चंद्रकांत म्हस्के यांना मिळाली. चौकशीत ती मध्यप्रदेशातील नारबद्रापूरम जिल्हयातील शोकापूर तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती पुढे आली. कन्या भोजनासाठी ती एक ठिकाणी कुटूंबीयांसमवेत जात होती.
याच प्रवासामध्ये मध्यप्रदेश येथून ती चुकून मुंबईकडे येणाºया रेल्वेमध्ये बसली. त्यानंतर ती थेट ठाणे रेल्वे स्थानकात उतरली. ही माहिती तिच्याकडून मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद साळवी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूझा आणि निरीक्षक अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या मध्यप्रदेशातील पालकांचा शोध घेतला. तेव्हा तिच्याकडून मिळालेल्या क्रमांकाच्या आधारे तिच्या भावाच्या मोबाईलवर पोलिसांनी सपर्क साधला. आपली बहिण दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे त्याने सांगितले.
याबाबत सोहादपूर पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाचा गुन्हाही २९ जून रोजी दाखल केल्याचेही ते म्हणाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक सोंडकर यांच्या पथकाने मध्यप्रदेश पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यानच्या काळात मुलीला ठाण्यातील मानपाडा येथील लिव्हीग वॉटर मिशन या संस्थेच्या वसतीगृहात आश्रयाला ठेवले. १ जुलै रोजी सोहादपूर पोलीस ठाण्याचे जमादार जी. एस. ठाकूर आणि पोलीस हवालदार अंकीत धनगर हे तिच्या पालकांसह ठाण्यात पोहचले. त्यानंतर तिला डिसूझा यांच्यासह निरीक्षक सोंडकर आणि उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सुखरुपपणे मध्यप्रदेश पोलिसांच्या समक्ष आई आणि भावाच्या ताब्यात दिले. आपली मुलगी सुखरूपपणे मिळाल्याने मुलीच्या नातेवाईकांनी कोपरी पोलिसांचे आभार मानले.