मडगाव - धार्मिक मूर्तीची तोडफोड करुन संपूर्ण गोव्यात दहशत माजविणारा फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याच्या तडीपारसंबधीचा खटला रेंगळला आहे. राज्यातील दक्षिण गोव्यातील जिल्हाधिका-यांच्या बदल्यांमुळे हा खटला रेंगाळू लागला आहे. आतार्पयत तीन जिल्हाधिका:यासंमोर हा खटला सुनावणीसाठी आला आहे.आज दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आग्नेल फर्नाडीस यांच्या समोर बॉयच्या तडीपारसंबधीचा शेवटचा युक्तीवाद होता. मात्र संशयिताच्या वकीलाने वेळ मागून घेतल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता 8 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.दक्षिण गोव्याचे माजी जिल्हाधिकारी अंजली सेहरावत व नंतर डॉ. तारीक थॉमस यांच्यापुढे यापुर्वी बॉयच्या तडीपारसंबधीचा खटला सुनावणीस आला होता. आता दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारपदी आग्नेल फर्नाडीस यांनी ताबा घेतला आहे. यापुर्वी या तडीपारसंबधीचा शेवटचा युक्तीवाद 23 नोव्हेंबर रोजी झाला होता.मागील सुनावणीच्या वेळी बॉय याच्यावर दाखल झालेल्या गुन्हयाचे सदयस्थिती काय आहे हे कळवावे असे सरकारपक्षाला सूचविले तसेच संशयिताच्या वकीलाला बॉय किती प्रकरणातून निदरेष सुटला आहे व त्याच्यावर सदया किती खटले प्रलंबीत आहे व त्या खटल्याची सदयस्थिती कळवावी असेही सूचित केले होते. बॉय याच्यावतीने वकील ऐरिक कुतिन्हो हे तर सरकारपक्षातर्फे व्हि.जे. कॉस्ता हे बाजू मांडत आहेत. आपल्या अशिलावर एकूण 19 गुन्हे नोंद झाले होते, त्यातील 12 प्रकरणात त्याची सुटका झाली आहे तर सात खटले सदया प्रलंबीत आहेत असे मागच्या सुनावणीच्या वेळी ऐरिक कुतिन्हो यांनी सांगितले होते. त्यावेळी बॉय याने तडीपार प्रक्रियेच्या सुनावणीच्या वेळी हजर रहावे असा समन्स जिल्हा प्रशासनाने बजाविला होता.दक्षिण गोवा पोलीस अधिक्षकांनी बॉय याला दक्षिण गोव्यातून तडीपार करण्यासंबधीची शिफारस केली होती. त्यासंबधी मागाहून बॉयला कारणो दाखवा नोटीसही बजाविण्यात आली होती. या नोटीसीला बॉयने आव्हान दिले होते. बॉयमुळे गावात दहशत निर्माण झाली असून, तुरुगांतून सुटल्यानंतर त्याने राजकारण्यावरही आरोप केले होते. या पाश्र्र्वभूमीवर पोलिसांनी त्याच्या तडीपारची शिफारस केली होती.14 जुलै 2017 रोजी बॉयला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर सुमारे 150 धार्मिक स्थळांची मोडतोड केल्याचा आरोप आहे. यातील काही प्रकरणात तो न्यायालयात निदरेषही सुटला आहे. कुडचडे येथील बॉय हा टॅक्सीची भाडी मारत होता. रात्रीच्यावेळी तो धार्मिक स्थळांची मोडतोड करीत असे असा पोलिसांचा आरोप होता. गोव्यात मागच्यावर्षी धार्मिक स्थळांची विशेषता क्रॉस मोडतोडीची अनेक प्रकरणो घडली होती. पोलिसांनी खास चौकशी पथक तपासासाठी तयार केले होते. पोलीस निरीक्षक रविंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नंतर बॉयला अटक केली होती. आज शुक्रवारच्या सुनावणीच्या वेळी फ्रान्सिस परेरा हेही हजर होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे बॉयची तडीपारी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 9:51 PM