नालासोपारा (मंगेश कराळे) :-
एटीएम कार्डची अदलाबदली करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत दुकलीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केले आहे. या आरोपींकडून ६ गुन्ह्यांची उकल करून रोख रक्कम, वेगवेगळ्या बँकेचे तीन एटीएम कार्ड, एक दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शुक्रवारी माहिती दिली आहे.
धानिवबाग येथे राहणारा तरुण रोहीत रामानंद राय (१९) हा २२ मार्चला संध्याकाळी धानिवबाग तलाव जवळील हिताची एटीएम सेंटरमधुन पैसे काढण्यासाठी गेला होता. दोन आरोपींनी त्यांना बोलण्यात गुंतवुन एटीएम कार्डची अदलाबदली करून ४४ हजार आणि एकाचे १९ हजार रुपये काढून फसवणूक केली होती. पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासुन एटीएम सेंन्टर मधुन पैसे काढुन देण्यासाठी मदतीचा बहाणा करुन हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करुन परस्पर एटीएम मशीन मधुन पैसे काढुन घेतले बाबतच्या घटनेत वाढ झाली होती. सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीत यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना व आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने वर नमुद गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख व त्यांच्या टीमला गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाव्दारे प्राप्त माहितीचे आधारे आरोपी साहील सलीम शेख आणि सागर अभिजीत मंडल या दोघांना ताब्यात घेवुन तपास केल्यावर हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ४ एप्रिलला अटक केली आहे. अटक आरोपीकडुन गुन्हयात वापरण्यात आलेली दुचाकी व गुन्हयातील फसवणुक झालेली दीड लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींकडून ६ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सचिन घेरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव आणि संतोष चव्हाण यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.