- मंगेश कराळे
नालासोपारा : ज्वेलर्स दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन सोनारास बोलण्यात गुंतवून हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दुकलीला विरारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून सहा गुन्ह्यांची उकल केली असून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी बुधवारी दिली आहे.
विरार येथे राहणारे मोहन ओझा (४७) यांचे वैभव नावाचे ज्वेलर्स दुकान आहे. १ जूनला संध्याकाळी आरोपी महिला सोन्याचे दागिने विकत घेण्याचे बहाण्याने येऊन त्यांना बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने चोरी करून नेले होते. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नमुद गुन्हया उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे विरार गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्राचे घटनास्थळ व आजुबाजुचे परिसरातील अंदाजे ५० ते ५५ ठिकाणचेसीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. आरोपीनी गुन्हा करतेवेळी वाहनाचा वापर केला असल्याचे दिसुन आले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे प्राप्त माहितीनुसार आरोपी बाळकृष्ण गायकवाड व महिला आरोपी ज्योती जसवंत सोलंकी यांना अंबरनाथ येथून ९ जूनला ताब्यात घेतले. दोघांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करुन त्यांच्याकडुन चोरी केलेली मालमत्ता व गुन्हयात वापरलेले वाहन अशी एकुण ६ लाख ८८ हजार ९६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीकडे अधिक तपास केल्यावर सहा गुन्ह्यांची उकल केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, संदिप शेरमाळे, योगेश नागरे, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, मोहसीन दिवाण, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार, नामदेव ढोेणे आणि सोहिल शेख यांनी केली आहे.