- मंगेश कराळे
नालासोपारा : मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १० मार्चला वाहन आणि मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींकडून ९ गुन्ह्यांची उकल करून चोरीचे ५ मोबाईल, ३ दुचाकी आणि १ रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती शनिवारी जनसंपर्क अधिकारी सपोनि विशाल धायगुडे यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्तालयात विशेषत: वसई-विरार परिसरात वाहन व मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या गुन्हेगारीवर आळा घालण्याकरीता व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी सूचना व मार्गदर्शन केले होते. मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार केले.
१० मार्चला गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे प्राप्त माहितीचे आधारे एक जण आचोळे रोड येथील सनशाईन कमर्शियल कॉम्प्लेक्स समोर येथे चोरीचे मोबाईल फोन विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. सदर ठिकाणी सापळा कारवाई करुन आरोपी गणेश अशोक पवार (२२) याला ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडून ५ मोबाईल फोन हस्तगत केले. याचबरोबर, एक जण चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी काशिमिरा, घोडबंदर येथील रिलायन्स पावर हाउसचे पाठीमागे येणार असल्याचे बातमी मिळाली. सदर ठिकाणी सापळा कारवाई करुन आरोपी कार्तिक प्रशात भुजे (२३) याला ताब्यात घेऊन त्याचेकडून ३ दुचाकी व १ रिक्षा अशी एकूण ४ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार अनिल नांगरे, जयकुमार राठोड, शिवाजी पाटील, राजाराम काळे, गोविंद केंन्द्रे, प्रविणराज पवार, राजबिर संधु, हनुमंत सूर्यवंशी यांनी केलेली आहे.