नवी मुंबई : घरफोडी प्रकरणी वाशी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ते सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबई व परिसरात चाळीस हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील ३ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कसून प्रयत्न सुरु आहेत. त्याकरिता गुन्हे घडणाऱ्या परिसरातले सीसीटीव्ही तपासले जात आहेत. यादरम्यान १०० हुन अधिक ठिकाणच्या सीसी टीव्हीच्या तपासणीत वाशी पोलिसांच्या हाती माहिती लागली होती. दोन व्यक्ती कार मधून परिसरात रेकी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी रात्रीच्या वेळी सापळा रचला होता. त्याकरिता वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहायक निरीक्षक सचिन ढगे, उपनिरीक्षक शशिकांत लोंढे, हवालदार शैलेंद्र कदम, संजय भाले, श्रीकांत सावंत आदींचे पथक तयार करण्यात आले होते. यावेळी शुक्रवारी रात्री दोघेजण संशयास्पद वावरताना आढळून आले. अधिक चौकशीत ते चोर असल्याचे समोर येताच त्यांना अटक करण्यात आली आहे.
संजय कांबळे (४२) व सद्दाम खान (३८) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून वाशी पोलिसठाने हद्दीतले तीन व दादरचा एक गुन्हा उघड झाल्याचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. त्यामधील ३ लाख ७७ हजार रुपये किमतीचा चोरीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. या दोघांवर मुंबई परिसरात ४० हुन अधिक गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून इतरही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने त्यांना १० डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.