ठाणे - मोटारसायकलवरुन येऊन ट्रक चालकांना मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे आणि इतर साहित्याची चोरी करुन पळून जाणाऱ्या शंकर खरात (24, रा. ठाणे) आणि आकाश वीर (21, रा. ठाणो) या दोघांनाही कासारवडवली पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे.
त्यांच्याकडून चोरीतील रोकड, ट्रेलरची चावी आणि चालक परवाना असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणो परिसरामध्ये परराज्यातून येणाऱ्या ट्रक आणि ट्रेलरच्या चालकांना मारहाण करुन त्यांच्याकडून रोकड, मोबाइल फोन जबरदस्तीने काढून घेण्याचे प्रकार सुरु होते. अशा प्रकारांवर आळा घालण्याचे आदेश देत यातील आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. जाधव, उपनिरीक्षक के. व्ही. मोरे तसेच पोलीस हवालदार राजेंद्र चौधरी, अंकुश पाटील, सुजित खरात, पोलीस नाईक विश्वनाथ धुर्वे, विजय जाधव आणि राजकुमार महापुरे आदींचे पथक 6 ऑक्टोंबर रोजी नागलाबंदर, आनंदनगर भागात पेट्रोलिंग करीत होते. तेंव्हा एका मोटारसायकलवरुन आलेले दोघेजण संशयास्पदरित्या वावरताना या पथकाला आढळले. त्यांना या पथकाने हटकले असता, हे दोघेही तिथून पळाले. त्यानंतर त्यांचा पाठलाग करुन शंकर आणि आकाश या दोघांनाही ठाणे महापालिकेच्या इमारतीजवळ पकडण्यात आले. त्यांनी कासारवडवली परिसरामध्ये केलेल्या एका जबरी चोरीची कबूली दिली. त्यानंतर त्यांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली. दोघांनाही 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
अशी करायचे लुटमारहे दोघेही परराज्यातून आलेल्या मोठया वाहनांसमोर जाणीवपूर्वक त्यांची दुचाकी ओव्हरटेक करीत असत. जबरदस्तीने वाहन थांबविण्यास भाग पाडून ट्रक चालकांकडून मोटरसायकलस्वार यांना धक्का लागून खाली पडून मोटारसायकलीचे नुकसान झाल्याची बनाव करीत असत. त्यानंतर वाहन चालकाला मारहाण करुन त्यांच्याकडील रक्कम, मोबाईल तसेच किंमतीऐवज जबरदस्तीने काढून लुटमार करुन पलायन करीत होते. त्यांनी अशा प्रकारे अनेक गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.