पिंपरी : पेट्रोलपंपावरील अकरा लाखांपेक्षा जास्त रकमेचा भरणा करण्यासाठी गेलेल्या एकाला पिस्तुलाचा धाकाने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने नागरिकांच्या मदतीने त्याला पकडले. आकुर्डी येथील खंडोबामाळ चौकातील तुळजा भवानी मंदिराजवळ सोमवारी (दि. २६) हा प्रकार घडला. ‘वर्दी’तील या ‘दुर्गा’च्या धाडसाचे कौतुक होत आहे.
निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवानिमित्त आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातील तुळजा भवानी मंदिराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. निगडी पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी सरस्वती काळे या सोमवारी दुपारी तुळजा भवानी मंदिराजवळ बंदोबस्तावर होत्या. त्यावेळी आकुर्डी येथील एका पेट्रोलपंपाची ११ लाखांपेक्षा जास्तीची रक्कम महाराष्ट्र बॅंकेच्या खंडोबामाळ चौकाजवळील शाखेत भरणा करण्यासाठी पेट्रोलपंपाचे कर्मचारी आले.
यातील एक कर्मचारी बॅंकेच्या पायऱ्या चढून जात असताना एका चोरट्यांना त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडी रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोरट्याच्या हातात पिस्तूल पाहून तेथील इतरांची धावाधाव सुरू होऊन गोंधळ उडाला. हा प्रकार बंदोबस्तावरील सरस्वती काळे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी लागलीच बॅंकेजवळ धाव घेतली. त्यावेळी पेट्रोलपंपाचा कर्मचारी आणि चोरटा यांच्यात झटापट सुरू होती.
पोलीस कर्मचारी सरस्वती काळे यांनी नागरिकांच्या मदतीले चोरट्याला पकडले. तसेच त्याच्याकडील पिस्तूल देखील काळे यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, मिरचीपूड मिळून आली. तसेच या चोरट्याच्या एका साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस आयुक्तांकडून ‘शाबासकी’चार जिवंत काडतुसे असलेले पिस्तूल चोरट्याच्या हातात होते. तरीही न घाबरता महिला पोलीस कर्मचारी सरस्वती काळे यांनी प्रसंगावधान राखत नागरिकांच्या मदतीने चोरट्याच्या हातातील पिस्तूल काढून घेऊन त्याल पकडले. या धाडसाचे शहर पोलीस दलातून कौतूक होत आहे. तसेच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या धाडसाबद्दल सरस्वती काळे यांना १० हजारांचा रिवाॅर्ड जाहीर केला आहे. तसेच मंगळवारी निगडी पोलीस ठाण्यात सरस्वती काळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.