वास्को: मागच्या काही वर्षात गोवा कस्टम विभागाने व डायरक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स विभागाने विविध प्रकरणात कारवाई करून जप्त केलेले विविध अमली पदार्थ शुक्रवारी (दि.२४) गोवा वैद्यकीय महाविद्यालयात योग्य सोपस्कारानंतर त्यांची विल्हेवाट लावली. विल्हेवाट लावण्यात आलेल्या या विविध अमली पदार्थांची किंमत ५ कोटी रुपये असल्याची माहीती गोवा कस्टम विभागाने दिली आहे.
शुक्रवारी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मदतीने विविध प्रकारचे अमली तसेच सायकोट्रॉपिक पदार्थांची कस्टम विभागाने विल्हेवाट लावली. विल्हेवाट लावण्यात आलेल्या या पदार्थात ३५४९ एक्सटसी गोळ्या, ९६० ग्राम एमडीएमए पावडर, ४०.७ लीटर केटामाइन लिक्वीड, ५३.६२ किलो केटामाइन पावडर, ९.३ कीलो चरस तसेच ४.९९५ किलो एफीड्रायीनचा समावेश असल्याची माहीती कस्टम विभागाने दिली. सदर अमली व सायकोट्रॉपिक पदार्थ मागच्या काही वर्षात केलेल्या विविध कारवाईत पकडण्यात आला असून सदर प्रकरणातील योग्य सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांची शुक्रवारी विल्हेवाट लावल्याची माहीती कस्टम विभागाने दिली.
गोवा कस्टम विभागाचे कमिश्नर मीहीर राजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली असून हा अमली पदार्थ विल्हेवाट लावण्यात येत असताना अमली पदार्थ विल्हेवाट समितीचे प्रज्ञाशील जुमले, कस्टम विभागाचे संयुक्त कमिश्नर डॉ. राघवेंद्र पी, सहाय्यक कमिश्नर सुनिल सजलन व इतर अधिकारी उपस्थित होते. सदर पदार्थ विल्हेवाट लावण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे सहकार्य गोवा कस्टम विभागाला मिळालेले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. शुक्रवारी विल्हेवाट लावण्यात आलेला ५ कोटीचा हा अमली पदार्थ मागच्या काही वर्षात विमानतळ तसेच इतर ठिकाण्यावरुन जप्त करण्यात आल्याची माहीती कस्टम विभागाने दिली. अमली पदार्थ पूर्णपणे रोखण्यासाठी कस्टम विभाग विमानतळ तसेच इतर विविध ठिकाणी कडक नजर ठेवत असून उचित कारवाई करण्यासाठी सतत सज्ज असते असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.