चेन्नई - मरीना बीचवर आंदोलन करण्यासाठी जमलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एच. राजा, पॉन राधाकृष्णन, सीपी राधाकृष्णन, एल. गणेशन यांच्यासह ३०० जणांवर चेन्नई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी मरीना बीचवर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सर्व नेत्यांसह ३०० जण तामीळ लेखक आणि काँग्रेसचे नेते नेल्लई कन्नन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत आंदोलनासाठी जमले होते. त्यावेळी चेन्नई पोलिसांनी कारवाई करत या सर्वांना ताब्यात घेतले.नुकतेच तामिळनाडू येथे झालेल्या बैठकीत बोलताना नेल्लई कन्नन यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) वादग्रस्त भाषण केले होते. अल्पसंख्यकांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची हत्या केली पाहिजे, असे आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक वक्तव्य तामीळ लेखक आणि काँग्रेसचे नेते नेल्लई कन्नन यांनी केले होते. भाजपाने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निषेध करण्यासाठी आयोजित सभेत २९ डिसेंबर रोजी नेल्लई कन्नन म्हणाले की, मला वाटत होते की कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना संपवेल पण असे झाले नाही. अमित शहा हे पंतप्रधान मोदी यांना नियंत्रित करत आहेत, असा आरोप कन्नन यांनी केला होता. कन्नन यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यासाठी तामिळनाडूच्या पोलिसांनी कन्नन याना अटक करावी अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय सचिव एच. राजा यांनी केली. त्यांनी याबाबत तामिळनाडू सरकार आणि पोलीस महानिदेशक यांच्याकडे तक्रार करून त्वरित करवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी या प्रकरणी नेल्लई कन्नन यांच्याविरुद्ध कलम ५०४, ५०५ आणि ५०५ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे आणि अटक देखील केली.