गुजरात - राजकोट येथील दोन पोलीस कॉन्स्टेबल यांचं टिक टॉकवर व्हिडिओ शूट केल्याने निलंबन करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये अलीकडेच पोलीस ठाण्यात टीका- टॉक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर करणं गुजरातमधील महिला पोलिसाला महागात पडलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.
ऑनड्युटी असताना पीसीआरची (पोलीस नियंत्रण कक्ष) व्हॅन चालविताना पोलीस कॉन्स्टेबल अमित प्रागजीने टिक टॉकवर व्हिडिओ बनविला आणि तो व्हिडिओ शूट करण्यास पोलीस कॉन्स्टेबल नीलेश पुनभाई याने मदत केली. वायरल व्हिडीओमध्ये पूर्व ट्रॅफिक वॉर्डन पीसीआर व्हॅनच्या बोनेटवर बसून अमित हा पोज देत होता आणि नीलेश याने टिक टॉक व्हिडीओ शूट केला. याप्रकरणी ऑनड्युटी असलेल्या या दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलचे आज निलंबन करण्यात आले आहे. हा व्हिडीओ जवळपास दीड महिन्यांपूर्वी रामनाथ पारा पोलीस लाईन परिसरात शूट करण्यात आला असल्याचं तपासात निष्पन्न झाला आहे. याआधी देखील मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज पोलीस ठाण्यात कार्यरत असणारी महिला पोलीस अर्पिता चौधरी हिनं कामावर असताना टीक- टॉक व्हिडीओ शूट केला. पोलीस ठाण्यात असलेल्या तुरुंगाच्या समोरच ती बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडीओ २० जुलै रोजी पोलीस ठाण्यात सिव्हिल ड्रेसमध्ये शूट करण्यात आला होता. त्यानंतर व्हॉट्सअॅपसह अन्य सोशल मीडिया साईटवर तो व्हायरल झाला आणि अर्पिताचं निलंबन करण्यात आलं होतं. गुजरातमधील ही दुसरी घटना असून टिक टॉकचं वेड कसं नोकरीवर घाला आणू शकतं याच हे उदाहरण आहे.