नवी दिल्ली – माझ्यावर देवाची कृपा आहे, मी तुमचे सर्व दु:ख दूर करेन असं सांगत स्वत:ला बाबा म्हणवणाऱ्या ३३ वर्षीय विनोद कश्यपने महिलांना जाळ्यात ओढले. त्यानंतर या महिलांचा बलात्कार केला. जर एखाद्या महिलेने विरोध केला तर तिला ब्लॅकमेल करून पैसे वसूल केले. इतकेच नाही तर या भोंदूबाबाने युट्यूबवर चॅनेलही उघडला आहे. हजारो युजर्स या भामट्याला फॉलो करतात.
जैसे ज्याचे कर्म, फळ देतो ईश्वर या म्हणीप्रमाणे विनोद कश्यपसोबतही तेच घडले. दिल्लीत राहणाऱ्या विनोद कश्यपविरोधात गाझियाबाद येथील ३-४ महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. विनोदवर बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप आहे. महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत त्याला अटक करून कोर्टात हजर केले. सध्या कोर्टाने विनोद कश्यपला पोलीस कस्टडीत पाठवले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बाबा माता मसानी चौकी दरबार नावाने हा आश्रम चालवत होता. पोलीस तक्रारीत महिलांनी त्यांच्यासोबत घडलेला अनुभव सांगितला.
पीडित महिलेने सांगितले की, मी माझ्या पतीसोबत बाबा मसानीकडे गेली होती. घरात खूप अडचणी होत्या. या समस्या दूर करण्याचा विश्वास देत बाबाने दीक्षेच्या नावावर ५ लाख रुपये मागितले. एवढे पैसे देण्यास आम्ही नकार दिला. त्यानतंर पुन्हा आम्ही बाबाकडे गेलो. तेव्हा त्यांनी प्रसादात नशेचे औषध मिसळले होते. त्यानंतर बाबाने माझ्यावर बलात्कार केला. आता तो पैशांसाठी ब्लॅकमेल करायला लागला. त्यानंतर दागिने विकून महिलेने पैसे दिले. तपासात हा बाबा गावातील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतो हे पुढे आले. कौटुंबिक आणि वैवाहिक वाद मिटवण्याचा बाबा दावा करतो.
तक्रारकर्त्या महिलांचा आरोप आहे की, हा भोंदूबाबा अवैध संबंधांबाबत कुटुंबाला सांगण्याची धमकी देत पैशांची मागणी करतो. या बाबाचे युट्यूब चॅनेलही आहे. त्यात ९०० हून अधिक व्हिडिओ आहेत. जवळपास ३४ हजार लोक त्याचे फोलोअर्स आहेत. पोलीस अधिकारी हर्षवर्धन यांनी सांगितले की, विनोद कश्यपने धार्मिक बाबा बनून द्वारका येथे २ मजली इमारतीत दरबार लावणे सुरू केले. अनेक वर्ष तो एका हॉस्पिटलमध्ये काम करत होता. ४-५ वर्ष विनोदने तिथे काम केले. तिथे महिन्याला २५ हजार पगार त्याला मिळत होता. त्यानंतर अचानक नोकरी सोडून त्याने आश्रम उघडण्याचा निर्णय घेतला. खासगी आयुष्यातील संबंधांबाबत समस्या दूर करण्याचा दावा तो करू लागला. त्यानंतर मला दैवी आशीर्वाद मिळाला असल्याची बतावणी त्याने लोकांना केली. २०१५ मध्ये विनोद कश्यपचे लग्न झाले होते आणि त्यातून त्याला ३ मुले आहेत.