अंबरनाथ : अंबरनाथमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणालाच पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीत तरुणाच्या कानाचा पडदा फाटला असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तर पोलिसांनी मात्र मारहाण झाल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. अंबरनाथ पश्चिमेला राहणारा सुमेध वेलायुधन हा तरुण त्याच्या बहिणीसह सोमवारी रात्री अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला होता. यावेळी खाडे नामक अधिकाऱ्यांनी त्याला बाहेर थांबण्यास सांगितले.
मात्र नंतर पाटील नामक एका कॉन्स्टेबलनी त्याला आतमध्ये बोलावले. मात्र त्याचवेळी खाडे यांनी त्याला आतमध्ये कसा आला? अशी विचारणा केली. यावर सुमेध वेलायुधन याच्या बहिणीने बोलण्याचा प्रयत्न केला असता खाडे यांनी सरळ सुमेध याला मारायला सुरुवात केल्याचा आरोप सुमेध वेलायुधन याने केला आहे. खाडे यांनी मला मारत मारत लॉकअपकडे नेले आणि इतक्या जोरात कानाखाली मारली की माझ्या कानाला इजा झाली, असा आरोप सुमेध वेलायुधन याने केला आहे. यानंतर सुमेध याने अंबरनाथ सिटीझन फोरमचे सत्यजित बर्मन यांना याची कल्पना दिली. बर्मन यांनी रात्री याबाबत पोलीस दलाच्या वरिष्ठांना ट्विट केल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाने याची त्वरित दखल घेतली. दरम्यान, बुधवारी सकाळी सुमेध हा उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात गेला असता त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचं डॉक्टरांनी सांगितले.
तसेच यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकारानंतर सुमेध वेलायुधन याने त्याला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर अंबरनाथ सिटीझन फोरमचे सत्यजित बर्मन यांनी संबंधित या पोलीस अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना विचारले असता, त्यांनी मात्र पोलिसांनी कुणालाही मारहाण केलेली नसल्याचे सांगितले आहे