मुंबई - अगदी सिनेमात घडावं तसं मुंबईतील कप परेड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर ताव मारून हजारो रुपयांचे बिल न भरता पळून जाणाऱ्या बाप - लेकास 'व्हिवान्ता प्रेसिडेंट' हॉटेलमध्ये अटक करण्यात आली आहे. या बाप- लेकाने आतापर्यंत मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलांना हजारो रुपयांचा गंडा घातला आहे. सुहास नेर्लेकर(५७) आणि स्वप्नील नेर्लेकर(३२) असं या ठग बाप लेकाचं नाव आहे. अटक करण्यात आलेले दोघंही कांदिवलीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघंही मोठे व्याापारी असल्याची बतावणी करून पंचतारांकित हॉटेलमध्ये फोन करून रूम बुक करतात. पंचतारांकित हॉटेलला जाण्यासाठी संबंधित हॉटेलमधून कार मागवायचे आणि हॉटेलमध्ये पोहोचताच चेक इन करण्याची वेळ आली की आम्ही थकलो आहोत अशी सबब द्यायचे. आधी जेवतो मग चेक इन करतो असं सांगून हॉटेलच्या डायनिंग रुममध्ये शिरायचे. हजारो रुपयांचं जेवण फस्त करायचे. सुरक्षा रक्षकांच्या तोंडाला पानं पुसून हॉटेलमधून पसार व्हायचे. या दोघांनी ताज ग्रुपच्या मुंबईतील अनेक हॉटेल्सची हजारो रुपयांची जेवणाची बिलं बुडवली. कुलाब्याच्या ताज हॉटेलला देखील या दोघांनी तब्बल ३२ हजार रुपयांचा चुना लावला होता. ताज ग्रुपच्या इतर हॉटेल्सची या दोघांनी फसवणूक केली असल्यामुळे 'व्हिवान्ता प्रेसिंडेट' हॉटेलच्या मॅनेजमेंटला ठगसेन बाप - लेकाबाबत अगोदरच कल्पना होती. शनिवारी या दोघांचे हॉटेलमध्ये आल्यापासूनच मॅनेजमेंटची त्यांच्यावर बारकाईने नजर होती. या दोघांच्या जेवणाचे बिल तब्बल ८ हजार ८८० रुपये झाले. जेवल्यानंतर दोघंही हॉटेलमधून पळून जात असताना त्यांना एका वेटरने अडवले आणि बिलचे पैसे मागितले. वेटरचं लक्ष विचलित करण्यास ते अयशस्वी झाले. अखेर त्या दोघांनी पैसे नसल्याची कबुली दिली. नंतर मॅनेजमेंटने दोघांना तात्काळ कफ परेड पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी नेर्लेकर बाप - लेकावर कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही शोध घेण्यात येतो आहे. इतर ताज ग्रुपच्या हॉटेल्सने देखील या दोघांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.