जळगाव : केंद्र सरकारने संपादित केलेली तसेच न्यायालयात दावा दाखल असलेल्या वादग्रस्त जमिनीची माहिती लपवून ठेवत त्याबाबत करारनामा करण्यास भाग पाडून अशोका बिल्डर्स व डेव्हलपर्स यांनी माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी अशोका बिल्डर्सचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, स्नेहल सतीश पारख ऊर्फ स्नेहल मंजीत खत्री, सतीश धोंडूलाल पारख, आशिष अशोक कटारिया व राजेंद्र चिंधूलाल बुरड (सर्व रा. नाशिक) यांच्याविरुद्ध बुधवारी रात्री शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अशोक कटारिया यांच्यासह पाच जणांनी ईश्वरलाल जैन यांच्याकडून २०१०-११ ते २०१४-१५ या काळात ११ कोटी रुपये व १९ कोटी २४ लाख ६० हजार १२५ रुपये हात उसनवारीने घेतले. त्यातील काही रक्कम संबंधितांनी जैन यांना परत केली. उर्वरित सहा कोटी ९९ लाख ३६ हजार ७४१ व १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० असे एकूण २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रुपये परत मागण्यासाठी तगादा लावला होता.
मुदतीची मागणीआरोपींनी मुदतीची मागणी करून नाशिक, सिन्नर येथील जमिनीचा संयुक्त करारनामा केला. मात्र त्यानंतरही रक्कम परत दिली नाही, असे जैन यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहेत.