मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. आज ईडीने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांचं वरळीतील घर जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले जप्त करण्यात आले आहेत.
इक्बाल मिर्ची प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. प्रफुल पटेल यांची २०१९ मध्ये चौकशीही झाली होती. इक्बाल मिर्ची प्रकरणी हे आरोप होते. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर आपलं म्हणणं मांडलं होतं. आता याच प्रकरणात ईडीने चार मजले म्हणजेच प्रफुल पटेल यांचं घर जप्त केलं आहे.
अंडर वर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या इकबाल मिर्चीचे फरारी असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने १९८६ मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत घेतली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्याकडे सीजे हाऊसच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर दोन फ्लॅट आहेत. २००७ मध्ये त्याच्या विकास करार होवून हस्तांतर करण्यात आले. पटेल यांचे त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाईल. दरम्यान, मिर्चीच्या मालमत्ता विक्री व्यवहारात कसलाही संबंध नसल्याचा दावा प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता.