नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाकडून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीपासून आज तूर्तास दिलासा मिळाला आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी ईडीला चौकशीसाठी चिदंबरम यांना तूर्तास अटक करता येणार नाही. कारण आज सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना तूर्तास अटकेपासून अंतरिम सरंक्षणाची मुदत वाढवली आहे. दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट उद्या सुनावणी घेणार आहे.
आयएनएक्स मीडिया कंपनीत ३०५ कोटी रुपयांच्या परकीय गुंवणुकीस १२ वर्षांपूर्वी लाच खाऊन गैरमार्गाने मंजुरी दिल्याच्या आरोपावरून सीबीआयच्या अटकेत असलेल्या माजी केंद्रीय वित्तमंत्री पी.चिदंबरम यांना कालच आणखी चार दिवस ‘सीबाआय’ कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील विशेष न्यायालयाने दिला. मात्र, याच प्रकरणात ‘ईडी’कडून होणारी संभाव्य अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी केलेल्या अपिलावरील सुनावणी आज पार पडली असून तूर्तास त्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या बुधवारी या दोन्ही प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर सीबीआयने चिदंबरम यांना रात्री त्यांच्या निवासस्थानी अटक केली होती. दुसऱ्या दिवशी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी त्यांना पाच दिवसांची कोठडी दिली होती. ती मुदत संपल्यावर सीबीआयने सोमवारी पुन्हा चिदंबरम यांना न्यायालयापुढे हजर करून आणखी पाच दिवसांच्या कोठडीसाठी अर्ज केला. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश कुहार यांनी आणखी चार दिवसांच्या कोठडीचा आदेश काल दिला.