लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या हैदराबादस्थित तक्शील सोल्युशन्स लि. या कंपनीने शेअर बाजारात सहभागी होण्यासाठी केलेल्या प्राथमिक समभाग विक्रीच्या किमतीमध्ये (आयपीओ) घोटाळा केल्याप्रकरणी तसेच या आयपीओद्वारे मिळालेले पैसे हडप केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये कंपनीच्या दोन संचालकांसह निर्मल कोटेचा या मुंबईस्थित शेअर दलालाचाही समावेश आहे. तिघांना २५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने समभाग विक्री करत भांडवल उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, समभागांची किंमत जास्त मिळावी, याकरिता कंपनीच्या आर्थिक उलाढालीमध्ये बनावटरीत्या मोठ्या प्रमाणावर वाढ दाखवली होती. त्या आधारे कंपनीने समभागाची किंमत जास्त मिळवण्याचा प्रयत्न केला. कंपनीने शेअर बाजारात दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ५५ लाख समभागांची विक्री प्रति समभाग १५० रुपयाने केली. याद्वारे कंपनीला ८० कोटी ५० लाख रुपये मिळाले.
असा उघडकीस आला घोटाळा ८० कोटी रुपयांपैकी ३५ कोटी ५० लाख रुपये कंपनीने अमेरिकास्थित एका कंपनीला तिच्याकडून काही सेवासुविधा घेतल्याचे दाखवत दिले. मात्र, तिथून हे पैसे सिंगापूरस्थित व हाँगकाँगच्या एका कंपनीत फिरवले. सिंगापूर व हाँगकाँग येथील या कंपन्या तक्शील कंपनीच्या संचालकांच्या मालकीच्या असल्याचे तपासात दिसून आले. या पद्धतीने हे पैसे लाटले गेले. तर, याच रकमेतील २३ कोटी रुपये कंपनीने सॉफ्टवेअर खरेदीकरिता खर्च झाल्याचे दाखवले. मात्र, हे पैसे देखील पुन्हा सिंगापूर व हाँगकाँग येथील त्याच कंपनीत पोहोचले. उर्वरित १८ कोटी रुपये समभाग विक्रीचा खर्च, विविध व्यापाऱ्यांची देणी, कंपनीच्या विस्तार कामाचा खर्च आदींकरिता झाल्याचे दाखविण्यात आले. भांडवली बाजार नियंत्रक संस्था असलेल्या सेबीने ईडीकडे गुन्हा दाखल केला होता.