पश्चिम बंगालमध्ये सध्या शिक्षक भरती घोटाळा गाजत आहे. सहारा स्कॅम, पाँजी स्कीम स्कॅमनंतर आता शिक्षक भरती घोटाळ्यामुळे ममता बॅनर्जींचे सरकार अडचणीत आले आहे. एका मागोमाग एक असे असंख्य घोटाळ्यांचे केंद्रबिंदू ठरल्याने प. बंगाल बदनाम होऊ लागला आहे.
असे असताना आता ममता यांचा आणखी एक आमदार ईडीच्या रडारवर आला आहे. ममता सरकारचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी हिच्याकडे नोटांचे ढीग सापडल्यानंतर दोघांनाही ईडीने ताब्यात घेतले आहे. यातच अर्पिताकडे चाळीस पानांची डायरी सापडली असून त्यात शिक्षक भरती घोटाळ्याचा सारा हिशेबच असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
एकीकडे या दोघांची चौकशी सुरु असताना ईडीसमोर तृणमूल काँग्रेसचे आणखी एक आमदार माणिक भट्टाचार्य यांचा कच्चा चिठ्ठा आला आहे. यामुळे ईडीने भट्टाचार्य यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ते पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष होते. यामुळे ईडीच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत. पार्थ यांच्या बॉडीगार्डची वहीणीपासून तीन चार नातेवाईकांची नावे देखील शिक्षक भरतीत आहेत. त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी भट्टाचार्य यांना बुधवारी दुपारी १२ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. जेव्हा पार्थ आणि अर्पिताच्या घरावर ईडीने छापे मारले होते, तेव्हा भट्टाचार्यंच्या कार्यालयातही ईडीचे अधिकारी आठ तास काहीतरी शोधत होते. त्यांच्या हाती सीडी लागल्या आहेत, यात महत्वाची माहिती असल्याचे ईडीने म्हटले आहे.