लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रेलिगेअर कंपनीत झालेल्या आर्थिक घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने डाबर समूहाचे अध्यक्ष मोहित बर्मन यांची चौकशी केली आहे. या प्रकरणात तेही आरोपी आहेत. रेलिगेअर कंपनीने दिलेल्या कर्जाचा पैसा अन्य कंपन्यांत वळवून त्याचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यासह अन्य काही लोकांवर आहे.याप्रकरणी मुंबईस्थित एका सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे ३१ लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यावर ईडीने या प्रकरणाचा तपास आता सुरू केला आहे.
मलविंदर मोहन सिंग, शिवेंद्र मोहन सिंग, सुनील गोधवानी यांनी संगनमत करून रेलिगेअर फायनान्स या कंपनीला २३९७ कोटी रुपयांचे कर्ज विविध कंपन्यांना देण्यास भाग पाडल्याच्या त्यांच्यावर ठपका आहे. या कंपन्यांना पैसे मिळाल्यानंतर मोहित बर्मन, मोनिका बर्मन, विवेकचंद बर्मन यांनी ते पैसे वळविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्याअनुषंगाने ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली आहे. त्यांच्याखेरीज रेलिगेअर कंपनीवर स्वतंत्र संचालक म्हणून काम पाहिलेल्या अन्य तिघांचीदेखील चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
या प्रकरणातील पैसा कसा हस्तांतरित झाला आणि त्याचा लाभ कुणाला मिळाला, या दृष्टीने आता ‘ईडी’चा तपास सुरू आहे.