शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. ११ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. वर्षा राऊत यांना दुसऱ्यांदा समन्स पाठवून ईडीने ५ जानेवारीला चौकशीला बोलावले होते. मात्र, एक दिवस आधीच वर्षा राऊत या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. मात्र, ईडीने आणखी एक समन्स पाठविल्याने आता यांना 11 जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
पीएमसी बँकेत वर्षा राऊत यांच्या खात्यात १२ वर्षांपूर्वी निकटवर्तीय प्रकाश राऊत यांच्याकडून ५० लाख रुपये भरण्यात आले होते. याबाबत प्रकाश राऊत व त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदविण्यात आला असून ईडी गेल्या दीड महिन्यापासून वर्षा राऊत यांच्याकडे पत्रव्यवहार करून विचारणा करीत आहे. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना २९ डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविले होते. मात्र संजय राऊत यांनी भाजपकडून ही राजकीय सुडातून कारवाई सुरू असल्याची टीका केली. मंगळवारी त्यांच्या पत्नी वर्षा या ईडीच्या कार्यालयाकडे गेल्या नव्हत्या.
दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने बजावलेल्या समन्सवरून राजकारणही पेटले आहे. शिवसेनेकडून ईडी आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच काही दिवसांपूर्वी ईडीच्या मुंबईतील कार्यालयावर भाजपा प्रदेश कार्यालय अशा नावाचे बॅनरही झळकवण्यात आले होते.