Sameer Wankhede Enforcement Directorate: मुंबई एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे नव्या अडचणीत अडकले आहेत. त्यांच्याविरुद्ध आज ED ने गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. ईडीने समीर वानखेडेंविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी यापूर्वीही समीर यांची चौकशी झाली होती. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी (१० फेब्रुवारी) हा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडेविरुद्ध 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट' (पीएमएलए ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर, ईडीने एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.
याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काही लोकांची चौकशीही केली आहे. ज्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत, त्यापैकी काही एनसीबीशी संबंधित आहेत. याशिवाय काही खासगी लोकांचाही समावेश असून, त्यांची चौकशी केली जाणार आहे. तपास यंत्रणेने या सर्वांना चौकशीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयात बोलावले आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आला.
लाच घेतल्याच्या आरोपावरून CBIने ही केलाय गुन्हा दाखल
मे २०२३मध्ये, सीबीआयने आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी समीर वानखेडे आणि इतर चौघांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या सर्व लोकांवर लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर सीबीआयने २९ ठिकाणी छापे टाकले. त्याच वेळी, समीर वानखेडे यांनी सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची आणि कोणत्याही दंडात्मक कारवाईपासून अंतरिम संरक्षणाची मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच वेळी, या एफआयआरच्या आधारे, ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
ईडीच्या कारवाईवर वानखेडे काय म्हणाले?
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, समीर वानखेडे यांनी सीबीआय एफआयआरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत कारवाईपासून संरक्षण मागितले होते. तसेच ईडी प्रकरणाविरोधातही त्यांनी अशीच मागणी केली आहे. वानखेडे यांनी ईडी प्रकरणात दिलासा मिळावा यासाठी उच्च न्यायालयासमोर केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, '2023 मध्ये दाखल सीबीआय एफआयआर आणि ईसीआयआरवर ईडीची ही अचानक कारवाई सूड आणि द्वेषाची भावना आहे.'