मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक ड्रग्ज इक्बाल मिर्ची याच्या जप्त केलेल्या वरळीतील मोक्याच्या जागेत सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) नवीन कार्यालय होणार आहे. त्यामुळे एकेकाळी ड्रग्ज तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या जागेत आता ईडीचे कार्यालय उभे राहणार असल्याने अनेक दिग्गज नेत्यांची चौकशी करणारे ईडी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
मिर्ची याचा २०१३ रोजी लंडनमध्ये मृत्यू झाला. त्याआधी त्याने अवैध धंदे, खंडण्या, ड्रग्ज तस्करीतून मिळवलेल्या पैशातून वरळीसह ताडदेव, क्रॉफर्ड मार्केटसह मुंबईत, तसेच विदेशातही मोक्याच्या ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या. ईडीने प्रीव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट (पीएमएलए) कायद्यांतर्गत आदेश जारी करत इक्बालच्या ६०० कोटीच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे.
मिर्चीने खरेदी केलेल्या वरळी येथील सीजे हाऊस येथे ईडीचे कार्यालय स्थलांतरित होत आहे. सध्या ईडीचे कार्यालय दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथे आहे. इक्बाल मिर्चीच्या या संपत्तीची एकूण किंमत शंभर कोटींहून अधिक होती. ईडीने १४ हजार स्क्वेअर फूट पसरलेल्या दोन या मजल्यांचा ताबा घेतला होता. ही मालमत्ता तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आहे. ईडीचे अधिकारी या नवीन कार्यालयात आवश्यक ते बदल करत आहेत.
विकासकाकड़ून १४ हजार चौ. फूटांचे फ्लॅट्स
मिर्चीने ही मालमत्ता मिलेनियम डेव्हलपर्सला विकली. बिल्डरने मिर्ची फॅमिलीला तिसऱ्या मजल्यावर ९ हजार चौ. फूट आणि चौथ्या मजल्यावर ५ हजार चौ. फुटांचे फ्लॅट्स दिले होते.
हॉटेल ते ड्रग्ज तस्करीचा अड्डा...
सीजे हाऊसच्या आधी येथे वरळीचे प्रसिद्ध गुरुकृपा हॉटेल होते. हे हॉटेल सी साईड इन आणि ललित रेस्टॉरंट म्हणूनही ओळखले जात असे. हे हॉटेल एम. के. मोहम्मदच्या नावाने होते. त्यांचा शेजारील जमीन मालकाशी वाद सुरू होता. १९८६ मध्ये इक्बाल मिर्ची याने ही मालमत्ता मोहम्मदकडून दोन लाख रुपयांना विकत घेऊन पहिली पत्नी हाजरा हिच्या नावावर केली होती. नंतर मिर्चीने गॅरेज आणि मालमत्तेला लागून असलेली इमारत अतिक्रमण करून तेथे पब सुरू केला. मात्र, नंतर त्याला हा पब बंद करावा लागला. तेथून तो ड्रग्जचा काळा धंदा करत होता.