झारखंडमध्ये ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयाच्या १७ ठिकाणांवर छापे मारले आहेत. यामध्ये ईडीचे अधिकारी कपाटांमध्ये दोन एके ४७ रायफल मिळाल्याने हादरले आहेत. प्रेम प्रकाश यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर हे छापे मारण्यात आले आहेत.
आज सीबीआयने बिहारमधील अनेक आरजेडी नेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. त्याचवेळी ईडीने झारखंडमध्ये मोर्चा वळविला आहे. ईडीने झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयावर छापे मारले आहेत. बेकायदा उत्खनन करणाऱ्या माफियांवर ईडीने जवळपास १८ ते २० ठिकाणी छापे मारले आहेत. झारखंडचे आमदार पंकज मिश्रा आणि बच्चू यादव यांची चौकशी केल्यानंतर ईडीने ही छापेमारी केली आहे. या दोघांनाही ईडीने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. ईडीने मार्चमध्ये मिश्रा आणि इतरांविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून छापे टाकण्यास सुरुवात केली.
आजच्या छाप्यांमध्ये प्रेम प्रकाशच्या घरात दोन एके-47 सापडल्याने खळबळ उडाली आहे. भाजपने याला भ्रष्टाचारावरील सूट म्हटले आहे, तर काँग्रेसने देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी दाबण्यासाठी ईडी आणि सीबीआयच्या छाप्यांचा हवाला दिला आहे. रांचीमधील हरमू येथे ईडीच्या पथकाने छापा टाकला, यावेळी कपाटांमध्ये एके ४७ सापडल्याने सीआरपीएफने जप्तीची कारवाई केली.
प्रेम प्रकाश हे झारखंडच्या राजकीय वर्तुळात बडी हस्ती आहेत, त्यांना पीपी म्हणून ओळखले जाते. झारखंडमधील नोकरशहा आणि राजकीय पक्षांमध्ये प्रेम प्रकाश यांची मजबूत पकड असल्याचे म्हटले जाते. याच ताकदीवर त्यांनी अनेक गौरखधंदे केल्याचे आरोप त्यांच्यावर होत होते.