नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यामागे गेल्या काही दिवसांपासून सीबीआयचा ससेमीरा लागला असून त्यांच्या पत्नी राबडी देवी यांचीही चौकशी करण्यात आली आहे. एकीकडे सीबीआयकडून तपास सुरू असताना आता अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीनेही लालूप्रसाद यादव यांच्या अनेक ठिकाणच्या सपंत्तीवर धाडी टाकल्या आहेत. लँड फॉर जॉब प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून दिल्ली, बिहार आणि युपीतील १५ ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.
ईडीने दिल्लीतील फ्रेंड्स कॉलनीत तेजस्वी यादव यांच्या घरावर धाड टाकली आहे. तर पाटनाचे माजी आमदार अबू दोजाना यांच्या घरावरही छापा टाकण्यात आलाय.
दरम्यान, ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईवर आरजेडीचे प्रवक्ता मृत्यूंजय तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला लोकशाहीवर विश्वास राहिला नाही, राजकीय हेतुनेच केंद्रीय तपास यंत्रणांकडून अशा पद्धतीने ह्या कारवाया करण्यात येत आहेत. उद्या भाजप विरोधी पक्षात बसल्यानंतरही त्यांच्या पक्षातील नेत्यांवरही ईडी आणि सीबीआयचे छापे पडतील.