नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई आणि कोलकाता येथे दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने बिल्डर ललित टेकचंदानी आणि त्यांच्या इतर साथीदारांशी संबंधित 22 ठिकाणी छापे टाकून 30 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. याशिवाय, त्यांचे बँक बॅलन्स आणि फिक्स्ड डिपॉझिट सुद्धा जप्त करण्यात आले आहे. ईडीने सोमवारी (१२ फेब्रुवारी) ही माहिती दिली.
ईडीच्या म्हणण्यानुसार, मनी लाँड्रिंग प्रकरणी गेल्या आठवड्यात बिल्डर ललित टेकचंदानी, त्यांचे पार्टनर अमित वाधवानी आणि विकी वाधवानी आणि इतर सहकारी यांच्या 22 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. फ्लॅटच्या संभाव्य खरेदीदारांसोबत फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या तरतुदींनुसार ही कारवाई केली होती. 7 फेब्रुवारी रोजी या पथकाने बिल्डर ललित टेकचंदानी यांच्याशी संबंधित मुंबई आणि नवी मुंबईतील 22 ठिकाणे छापेमारी केली.
तळोजा पोलिस स्टेशन आणि चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या दोन एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू केल्याचे ईडीने सांगितले. या एफआयआरमध्ये, सुप्रीम कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या टेकचंदानी आणि इतरांनी चालवल्या जाणाऱ्या कंपनीने नवी मुंबईतील तळोजा येथील एका गृहनिर्माण प्रकल्पात फ्लॅट खरेदीदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील तळोजा येथील एका गृहनिर्माण प्रकल्पात कंपनीने 1700 हून अधिक घर खरेदीदारांकडून 400 कोटींहून अधिक रक्कम उभी केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. ईडीने म्हटले आहे की, प्रकल्पाला झालेल्या विलंबामुळे या गृहखरेदीदारांना सदनिका किंवा परतावा दिला नाही. तसेच, खरेदीदारांकडून मिळालेली रक्कम बिल्डरने वैयक्तिक फायद्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांसह विविध नावे मालमत्ता तयार करून पळवून नेली.
रेशन घोटाळ्याप्रकरणी कोलकात्यात अनेक ठिकाणी छापेदुसरीकडे, पश्चिम बंगालमधील कोट्यवधी रुपयांच्या रेशन घोटाळ्याच्या तपासासंदर्भात ईडीने मंगळवारी (13 फेब्रुवारी) सकाळी कोलकातामधील अनेक ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय दलांसोबत असलेल्या ईडीच्या पथकांनी सॉल्ट लेक, कैखली, मिर्झा गालिब स्ट्रीट, हावडा आणि इतर काही ठिकाणी छापे टाकले. ज्यांची चौकशी केली जात आहे, त्यात व्यापारी आणि घोटाळ्यात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या जवळच्या लोकांचा समावेश आहे.
तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याला अटकईडीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "हे छापे रेशन वितरण घोटाळ्याशी संबंधित आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची चौकशी केल्यानंतर आम्हाला या लोकांच्या सहभागाची माहिती मिळाली आहे.'' दरम्यान, पश्चिम बंगालमधील रेशन वितरणातील अनियमिततेच्या आरोपाखाली तपास यंत्रणेने राज्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यासह इतर लोकांना अटक केली आहे.