पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. खाटेखाली 500 आणि 2000 च्या नोटांचे गठ्ठे सापडले आहेत. सकाळी ईडीच्या पथकाने गार्डनरिच येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक निसार खान यांच्या घरावर छापा टाकला. तेथून मोठी रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. 500 आणि 2000 रुपयांचे अनेक बंडल खाटेखाली प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये गुंडाळलेले आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खाटेखाली 15 कोटी रुपयांचे नोटांचे बंडल सापडले आहेत.
मोबाईल गेम एपच्या फसवणुकीत निसार खान यांचा सहभाग असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कोलकात्यात सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. कोलकात्याच्या गार्डनरिचच्या शाही स्टेबल लेनमधील निसार खान यांच्या घराला केंद्रीय सैन्याने घेरलं आहे. ईडीचे आणखी अधिकारी सॉल्ट लेकमधील सीजीओ कॉम्प्लेक्समधून व्यावसायिकाच्या घराकडे रवाना झाले आहेत. ईडीच्या अधिकार्यांनी गार्डनरिचमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक निसार खान यांच्या घरातून मोठी रक्कम जप्त केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निसार यांच्या दुमजली घरात खाटेखाली प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळलेल्या 500 रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल सापडले आहेत. 2000 रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले. शनिवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोलकात्यात तीन ठिकाणी संयुक्त कारवाई केली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्क स्ट्रीटजवळील मॅक्लिओड स्ट्रीटवर ही कारवाई करण्यात येत आहे. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, उर्वरित दोन छापे बंदराला लागून असलेल्या भागात आणि गार्डनरिचच्या रॉयल स्टॅबल परिसरात टाकण्यात आले.
संपूर्ण घराला सीआरपीएफ जवानांनी घेरलं आहे. याशिवाय संपूर्ण परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ईडीने यापूर्वीच बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. पैसे मोजण्याचे यंत्रही आणले जात असल्याची माहिती आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले पैसे मोठ्या प्रमाणात बेहिशोबी आहेत. मात्र, हा पैसा कुठून आणि कसा आला, याबाबत कोणतीही माहिती देऊ शकली नाही. या कारणास्तव केंद्रीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी निसार खान आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.