नवी दिल्ली - घराचं स्वप्न दाखवून खरेदीदार आणि गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने पंजाबमधील रिअल इस्टेट समूहावर छापा टाकून ऑडी कार, 85 लाख रुपये रोख आणि अनेक कागदपत्रं जप्त केली आहेत. ईडीने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, घर खरेदीदारांसोबत झालेल्या फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी चंदीगड, अंबाला, पंचकुला, मोहाली आणि दिल्ली येथील 19 ठिकाणी छापे टाकण्यात आले. याच दरम्यान गुप्ता बिल्डर्स अँड प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्याशी संबंधित लोकांची शोधमोहीम घेण्यात आली. या लोकांमध्ये गुप्ता बिल्डर्सचे संचालक सतीश गुप्ता आणि प्रदीप गुप्ता यांचा समावेश होता. याशिवाय समूहाच्या सहयोगी बाजवा डेव्हलपर्स लिमिटेड, कुमार बिल्डर्स, विनमेहता फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले. ईडीने त्यांचे संचालक जरनैल सिंह बाजवा, नवराज मित्तल आणि विशाल गर्ग यांच्या घरांवरही छापे टाकले होते.
पंजाब पोलिसांनी आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता आणि आरोप केला होता की त्यांनी विविध व्यक्तींच्या संगनमताने घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना फ्लॅट, प्लॉट आणि व्यावसायिक युनिट्स विकण्याचे आश्वासन दिले होते. असे करून कोटय़वधी रुपये उभे केले. पण नंतर ना फ्लॅट, ना प्लॉट, ना कमर्शियल युनिट्स. एवढेच नाही तर सुमारे 325 कोटी रुपये लोकांना परत केले नाहीत. यानंतर ईडीने त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला.
कंपनीच्या संचालकांनी निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांच्या विकासाच्या नावाखाली लोकांकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करून त्यांच्याकडून खासगी मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कामात त्यांच्या सहकाऱ्यांनीही साथ दिली. छापेमारी दरम्यान स्थावर आणि जंगम मालमत्तेशी संबंधित सर्व कागदपत्रं, 85 लाख रुपये रोख आणि एक ऑडी क्यू7 कार जप्त करण्यात आली आहे, असं एजन्सीने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.