मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, राऊत चौकशीला अनुपस्थित राहिले आणि त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने ईडीकडे मुदतवाढीचा अर्ज केला होता. नंतर १ जुलैला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे दुसरे समन्स जारी केले होते. त्यानुसार कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांची तब्बल १० तास ईडीने चौकशी झाली आणि पावणे दहाच्या सुमारास राऊत ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. आता संजय राऊत यांना तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे.
ईडीने राऊत यांना उद्या सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. पण राऊत सध्या दिल्लीत असून ते चौकशीला उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. १ जुलैला चौकशीदरम्यान संजय राऊत यांनी ईडीला नकारात्मक उत्तरं दिली. १० वर्षांनंतर पत्रा चाळ प्रकल्प रखडल्यानंतर आता सुरु असलेल्या चौकशीत संजय राऊत नकारात्मक उत्तरं देत असल्याचे वृत्त होते. संजय राऊत यांनी मला पत्रा चाळ कुठेय माहित नाही असं उत्तर ईडीला दिलं. त्यावर ईडीने मग गैरव्यवहार कसा झाला असा प्रतिसवाल केला होता. परंतू संजय राऊतांनी आपण तपास यंत्रणेला सहकार्य केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मनात काही शंका असल्यास केंद्रीय यंत्रणांसमोर जाणे हे आपले कर्तव्य आहे. आमची १० तास चौकशी झाली आणि आम्ही पूर्ण सहकार्य केल्याचे राऊत म्हणाले होते.